निमित्त – रुबाबदार मायमराठी 

>> प्रा. वर्षा चोपडे

तुझिया पायी तन मन धन

मी वाहियले,

तुझिया नामी, तुझिया धामी

अखंड रंगुनि राहियले

पल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी इ.स. 2013 रोजी घेण्यात आला. मराठीच्या अभिमानाची कूळकथा मोठी बोलकी आहे. मराठी हे केवळ संवादाचे साधन नाही; महाराष्ट्रातील लोकांची ओळख स्पष्ट करणारा हा सांस्कृतिक दिवाण आहे. अनेक महान संतांनी आपल्या मराठी भाषेचा गौरव आणि महिमा वर्णन केला आहे. ज्ञानेश्वरांनी तिच्याद्वारे अमृताशी पैज जिंकण्याची भाषा केली. 13 व्या शतकातील संत आणि कवी ज्ञानेश्वर आणि 17 व्या शतकातील संत तुकाराम यांनी मराठी साहित्यात मोठे योगदान दिले आहे.

1614 मध्ये ‘क्रिस्तपुराण’ लिहिणाऱ्या फादर स्टीफन्ससारख्या ख्रिस्ती मिशनऱ्याने मराठीचा महिमा गाऊन तिला ‘सर्व भाषांमाजि साजिरी’ ठरविली. मराठीची कथा प्राचीन प्राकृत भाषांमधून सुरू होते, तिची मुळे 10व्या शतकात आहेत. इंडो-आर्यन भाषा कुटुंबातील सदस्य म्हणून मराठीला संस्कृत, पाली आणि इतर प्रादेशिक भाषांसह एक भाषिक वंश आहे. मराठी  बोलींमध्ये कोकणी, गोवानीज, खान्देशी अहिराणी, पुणेरी, मराठवाडा आणि वऱहाडी-नागपुरी यांचा समावेश होतो. भाषा सारखीच, लिहिण्याची पद्धतही एकच, पण बोलण्याच्या तऱहा वेगवेगळ्या. गोवा, बेळगाव, कर्नाटकची मराठी, ती तर निराळीच आहे, पण संवाद कळतो हे महत्त्वाचे. मराठी सजलेली सुंदर भाषा आहे. उत्पत्तीपासून ते महाराष्ट्राची अधिकृत भाषा होण्यापर्यंत मराठी अनेक शतके उपांत झाली आहे.

मराठी भाषिक राजाने, छत्रपती शिवाजी महाराजांनी शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले, पण सगळे मराठीच्या जोरावर,  महाराजांनी  इतके अद्भुत यश मिळवले, पण भाषा कधीच अडचण ठरली नाही. परकीय भाषा शिकणे वाईट नसले तरी आपल्या भाषेचा राजास प्रचंड अभिमान होता. महाराजांच्या काळात मराठी साहित्याच्या विकासाला वेग आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘राज्यव्यवहार कोश’ करवून घेऊन राजकीय भाषाशुद्धी साधली. ब्रिटिश वसाहत काळात ख्रिश्चन मिशनरी विल्यम केरी यांच्या प्रयत्नांतून मराठी व्याकरणाचे प्रमाणीकरण झाले.

ऐतिहासिक माहितीनुसार बाणभट्टाची मराठी कादंबरी ही कदाचित सर्वात जुनी कादंबरी लिहिली गेली.  बाबा पदमजींनी 1857 मध्ये मराठीत लिहिलेली ‘यमुना पर्यटन’ ही देशातील सर्वात प्राचीन कादंबरींपैकी एक होती.

मराठी साहित्याच्या इतिहासातील एक रंजक गोष्ट म्हणजे या भाषेत छापलेले पहिले पुस्तक हे इसापच्या दंतकथांचे भाषांतर होते. मराठी चित्रपटसृष्टीला, विशेषत: आपल्या आगळ्यावेगळ्या कथाकथनाने आणि कलात्मक अभिव्यक्तीसाठी ओळख मिळाली आहे. मराठीचे सांस्कृतिक महत्त्व त्याच्या भाषिक सीमांच्या पलीकडे पसरलेले आहे, ज्यामुळे भाषिकांमध्ये एकतेची आणि अभिमानाची भावना निर्माण होते.

वसंतराव नाईक सरकारने  मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करीत प्रादेशिक स्तरावर चार केंद्रांची स्थापना केली. राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले. अनेक मराठी लोकांसाठी व अधिकाऱ्यांसाठी ‘राजभाषा परिचय’ पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा हाच यामागील उद्देश होता. मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेल्या समितीने असा दावा केला आहे की, मराठी किमान 2300 वर्षांपूर्वी अस्तित्वात होती.

या मराठी मातीने अनेक संत, संशोधक, शैक्षणिक तज्ञ, गायक, वादक, खेळाडू, चित्रपट दिग्दर्शक, नटनटय़ा जगास दिले. खरे तर वीर राणी लक्ष्मीबाई, देवी अहिल्याबाई  होळकर, सावित्रीबाई फुले, साने गुरुजी, लोकमान्य टिळक, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माननीय बाळासाहेब ठाकरे अशी अनेक सन्माननीय नावे उच्चारली तरी  महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक योगदानाची कल्पना येऊ शकते. असे योगदान देणारे नागरिक प्रत्येक मराठी घरात असावेत.

मराठी शिका, घरात बोला, बाहेर बोला. तिचा अभिमान बाळगा. मराठी पुस्तके वाचा. आपल्या भाषेला वैभव प्राप्त करण्यास हिरिरीने भाग घ्या. मराठी कथाकथन, मराठी निबंध स्पर्धा, मराठी सांस्कृतिक देवाणघेवाण ही काळाची गरज आहे. मराठी असल्याचा अभिमान बाळगा आणि महाराजांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा.  मराठी असणे आपले भाग्य आहे. महाराष्ट्रात जन्म होणे आपली पुण्याई आहे. कारण आपण मराठीच्या सुवर्ण इतिहासाचे वारस आहोत.

27 फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिवस’  आणि 1 मे ‘मराठी राजभाषा दिवस’  साजरा करण्यात येतो. या दोन्ही दिवसांचे स्वतंत्र असे महत्त्व आहे. असा हा मराठी भाषा गौरव दिवस आपण कृतीतून, साहित्यातून, लेखनातून कायम जपला पाहिजे आणि आपली मराठी भाषेविषयीची आस्थाही जपली पाहिजे.

[email protected]

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)