पुणे महापालिकेचा कोविड घोटाळा उघड; माजी आरोग्यप्रमुखांसह तिघांवर गुन्हा

कोरोना काळात महापालिकेच्या वारजे येथील रुग्णालयात शासनाने पुरविलेले कोरोना टेस्ट किट, सॅनिटायझर, औषधांची परस्पर खासगी रोगनिदान केंद्र चालकांना विक्री करून 80 ते 90 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पालिकेचे माजी आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह तिघांविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमताने सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करून खोटी कागदपत्रे तयार करून टेस्टसाठी आलेल्या नागरिकांच्या नोंदवहीमध्ये खोटय़ा नोंदी केल्याचेदेखील उघड झाले आहे.

डॉ. आशिष भारती, डॉ. अरुणा सूर्यकांत तायडे, डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सतीश बाबूराव काळसुरे (42) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शासनाची फसवणूक, तसेच अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागात महापालिकेचे अरविंद बारटक्के रुग्णालय आहे. 2021 मध्ये कोरोना काळात बारटक्के रुग्णालयात कोरोना चाचणी साहित्य,औषधे, सॅनिटायझर तसेच अन्य वैद्यकीय साहित्य पुरविण्यात आले होते. बारटक्के रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. तायडे, गार्डी आणि महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. भारती यांनी नागरिकांच्या कोरोना चाचणीबाबतच्या बनावट नोंदी केली. नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली, असे भासविले. प्रत्यक्षात त्यांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या वैद्यकीय साहित्याची परस्पर खासगी रोगनिदान केंद्र चालकांना विक्री करून 80 ते 90 लाखांची फसवणूक केल्याचे काळसुरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी काळसुरे चौकशीची मागणी केली होती. त्यांनी न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दिली होती. न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर तपास करीत आहेत.