पुणे – तळजाई वसाहतीत दहशत माजविणार्‍या आरडे टोळीवर ‘मोक्का’

सहकारनगर भागातील तळजाई वसाहतीत दहशत माजविणार्‍या गुंड मयूर आरडे टोळीविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही 39 वी कारवाई आहे.

टोळीप्रमुख मयूर रंगनाथ आरडे (वय 22), हृषीकेश संजय लोंढे (वय 23), रोहन राजू आरडे (वय २१), आदित्य पद्माकर डाकले (वय 20), आकाश मनोज डाकले (वय 23), अनिकेत रवींद्र शिंदे (वय २४), ऋषभ शंकर कांबळे (वय 23), जयेश दत्ता ढावरे (वय 19) सर्व रा. पद्मावती, तळजाई वसाहत) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तळजाई वसाहतीत मयूर आरडे टोळीने दहशत माजविली होती. लुंकड शाळेजवळ एका तरुणाला मारहाण करुन टोळक्याने वाहनांची तोडफोड केली होती. आरडे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी तयार केला. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत हा प्रस्ताव पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे सादर केला. प्रस्तावाला पाटील यांनी मान्यता दिली. सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर पुढील तपास करत आहेत.