नरेंद्र मोदी, RSS, BJP चा संविधान आणि लोकशाही संपवण्याचा कट! राहुल गांधी यांचा हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक क्रांतिकारी योजनांची घोषणाही केली. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी सभा घेतली.

मोदींनी 10 वर्षांत तुमचं कर्ज माफ केलं नाही. मात्र आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचं कर्ज लगेच माफ करू. शेतीसाठी देशात एका कृषी आयोगाची स्थापना केली जाईल. ज्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडेल तेव्हा आयोग संबंधित राज्य सरकारला शिफारस करेल. यामुळे शेतकऱ्यांची एकदाच नव्हे तर अनेकदा कर्जमाफी होईल, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं.

ही निवडणूक संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने संविधानावर आक्रमण केले आहे आणि संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडी संविधानाची आणि लोकशाहीचे रक्षण करत आहे. दुसरीकडे नरेंद्र मोदी, आरएसएस आणि भाजप हे संविधान आणि लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या नितीन गडकरींवर कारवाई कधी?: अतुल लोंढे

नरेंद्र मोदी यांनी 25 ते 30 उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज माफ केलं. हिंदुस्थानमधील शेतकऱ्यांचं, मजुरांचं, मागासवर्गीयांचं, दलितांचं, विद्यार्थ्यांचं किती कर्ज नरेंद्र मोदींनी माफ केलं? एक रुपयाही हिंदुस्थानमधील गरीबांचा मोदींनी माफ केला नाही, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्यावर प्रत्येक वर्षी थेट बँक खात्यात एक लाख रुपये जमा करेल. महिनेच्या 8 हजार 500 रुपये म्हणजे वर्षाचे एक लाख रुपये कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात जमा होतील. प्रत्येक महिन्याला ठकाठक… ठकाठका… ठकाठक… पैसे येतील महिलांच्या बँक खात्यात. तुम्ही अब्जाधीश बनवा, आम्ही लखपती बनवू. तुम्ही 25 अब्जाधीश बनवा, आम्ही कोट्यवधी लखपती बनवू, असं राहुल गांधी म्हणाले.