अभिप्राय – देशोदेशीच्या कथा

>>राहुल गोखले 

अनुवादित साहित्याच्या संग्रहाचा पोत मुख्यत दोन निकषांवर ठरतो. एक, प्रत्यक्ष अनुवाद आणि दुसरा, निवड. या दोन्ही निकषांना न्याय देणाऱया वर्षा गजेंद्रगडकर यांचा ‘ते हृदयीचे ये हृदयी’ (शब्दमल्हार प्रकाशन) या कथासंग्रहात मूळच्या केवळ पाश्चात्त्य भाषांबरोबरच हिंदुस्थानी भाषांमधीलदेखील कथा आहेत. स्वत लेखिकेने नमूद केल्याप्रमाणे मूळ कथेचा अनुवाद करताना पुन्हा कथनाचे तंत्र त्यांनी योजिले असल्याने मूळच्या दीर्घकथांचाही अनुवाद कथेच्या गाभ्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेत अतिशय नेटका आणि सुटसुटीत करण्यात त्यांना यश आले आहे. या कथांचे मूळ लेखक जरी पाहिले तरी त्यातील वैविध्य आणि व्यापकता लक्षात येईल. ओ हेन्री, सॉमरसेट मॉम, स्टीफन ाsढन, लुई कुपेरू, ग्रॅहम ग्रीन अशा अव्वल पाश्चात्त्य कथाकारांच्या कथा संग्रहात आहेत.

‘ख्रिसमस गिफ्ट’, ‘शिशिर आणि वसंत’ आणि ‘वीस वर्षांनंतर’ या तिन्ही कथा कथेला शेवटास कलाटणी देण्याच्या ओ हेन्रीच्या हातोटीचा प्रत्यय आणून देणाऱया. ‘ख्रिसमस गिफ्ट’मधील जिम आणि डेला या परस्परांना भेटवस्तू देण्यासाठी गाठीशी पैसे असावेत म्हणून स्वतच्या अत्यंत आवडीच्या वस्तू कशा विकतात आणि अंतिमत दोघांना परस्परांकडून मिळालेल्या भेटी अपूर्णतेची जाणीव करून देतात. मात्र कथेच्या या अकल्पित शेवटाने कथेची खुमारी वाढते. ‘शिशिर आणि वसंत’ कथेत कॅप्टन आणि थियोडोर यांच्या वयातील अंतर हे थियोडोरने लग्न न करण्याच्या निर्णयांचे कारण. मात्र हेन्री या कथेला अशी कलाटणी देतो की, वाचक अचंबित होऊन जातो. सॉमरसेट मॉम याची ‘निरक्षर’ ही एका व्हर्जरची कथा. फोरमन नावाच्या या व्हर्जरला तो निरक्षर असल्याने धर्मगुरू चर्चमधून काढून टाकतो. तोच व्हर्जर पुढे व्यवसाय सुरू करतो आणि त्यात एवढी बरकत येते की, बँकेचा मॅनेजर त्याला गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो. बोलणे सुरू असताना मॅनेजरला लक्षात येते की, व्हर्जर निरक्षर आहे. तेव्हा आश्चर्याने तो म्हणतो की, “तुम्ही साक्षर असतात तर काय काय केलं असतं?” याला व्हर्जरने दिलेले उत्तर हे या कथेचेच मर्म नव्हे, तर एका अर्थाने इष्टापत्तीची आणि त्याबरोबरच माणसाच्या विधिलिखिताच्या अपरिहार्यतेची जाणीव करून देणारे. व्हर्जर म्हणतो, “साक्षर असतो तर चर्चमध्ये व्हर्जर असतो.”

विविध हिंदुस्थानी भाषांमधील निवडक कथांचाही बहारदार अनुवाद लेखिकेने केला आहे. रवींद्रनाथ टागोर, आशापूर्णा देवी, मीनल दवे, निरंजन, अखिलमोहन पटनाईक, जयशंकर प्रसाद यांच्या कथांचा अनुवाद वाचनीय. एका आगळ्या कथेचा आवर्जून उल्लेख करावयास हवा; ती आहे पी. व्ही. नरसिंह राव यांची. ‘मंत्रीमहाशय’ या कथेत राव यांनी जवळपास स्वानुभव ओतला आहे असेच म्हटले पाहिजे. कथा कोणत्याही भाषेतील, संस्कृतीतील, काळातील असल्या तरी माणसांच्या भावभावना, स्वभाव, नातेसंबंध यांचे साम्य त्यांतून अधोरेखित होईल. अनुवाद करताना कथांच्या मूळ शीर्षकाचे मर्मदेखील या शीर्षकांत उतरले आहे याचाही आवर्जून उल्लेख करावयास हवा.

ते हृदयीचे ये हृदयी 

लेखिका : वर्षा गजेंद्रगडकर

प्रकाशक : शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक

पृष्ठे : 205, मूल्य : 350 रुपये