आपल्याकडचे नेते मिंधे; त्यांनी मने आणि स्वाभिमान गहाण टाकलाय – राज ठाकरे

महात्मा फुले यांनी सहकार चळवळ उभी केली. मात्र आताचे सरकार ‘सहारा’ चळवळ चालवत आहे. सरकार पुढे ढकलण्यासाठी सगळेच एकमेकांना सहारा देत आहेत. त्यामुळे कोणी तुमची बाजू घेईल या आशेवर बसू नका. आपल्याकडचे नेते मिंधे असून ते पैशासाठी वेडे झाले आहेत. ते फक्त या पक्षातून त्या पक्षात उडय़ा मारतात, या मिंधे नेत्यांनी त्यांची मने आणि स्वाभिमान गहाण टाकला आहे, अशी खरमरीत टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिंधे सरकारवर केली.

नेरळ येथे झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेन तसेच अन्य प्रकल्पावरून सरकारला जाब विचारला. ते म्हणाले, बुलेट ट्रेन, नवी मुंबई विमानतळ, शिवडी-न्हावाशेवा सेतू असे अनेक मोठे प्रकल्प सध्या सुरू आहेत. मात्र या प्रकल्पांच्या आजूबाजूच्या जागादेखील पद्धतशीरपणे विकत घेतल्या जात आहेत. ही लोपं कोण आहेत? पुढे ते त्यांचीच भाषा आपल्यावर लादतील. खरे तर ही महाराष्ट्रविरोधी सहकार चळवळ चालवली जात आहे असे त्यांनी सांगितले. उद्या महाराष्ट्राचे तुकडे करायला हे मागेपुढे पाहणार नाहीत, अशी टीकादेखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे नाव न घेता केली.