मंथन – ‘मध्यमवर्ग’ ते ‘निरुपयोगी वर्ग’!

>> राम जगताप

कालपर्यंत ‘मध्यमवर्ग’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या तुम्हाआम्हा सगळ्यांची आजची अवस्था वेगळी आहे. खरं तर कालपर्यंत चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही अर्थांनी ज्याला ‘मध्यमवर्ग’ म्हटलं जात होतं, तो गेल्या दहा वर्षांत तंत्रज्ञान नावाच्या काळपुरुषानं गिळंकृत केलाय. नव्वदच्या दशकात या वर्गाला ‘सुबत्तेच्या विषाणू’ने ग्रासले होते, पण आताच्या तंत्रज्ञानानं त्याचा फार धुव्वा उडवलाय. आता त्याला ‘निरुपयोगी वर्ग’ याच नावानं ओळखायला हवं. उपयोगाचा कुणाच्याच नाही, पण सर्वांच्याच ‘मुळा’वर उठवलेला वर्ग म्हणजे हा आजचा ‘निरुपयोगी वर्ग’.

वास्तव आकांक्षेकडून अवास्तव महत्त्वाकांक्षेच्या दलदलीत रुतलेला समाज 

वाळूत तोंड खुपसून बसलेला शहामृगी संप्रदाय 

स्वत:चं कलेवर सत्ताधाऱ्यांना ‘गिनिपिग’ म्हणून दिलेली जमात 

आत्ममग्न, आपमतलबी, निर्ढावलेला, असंवेदनशील जमाव

इतरांचा द्वेष-तिरस्कार करणारी आणि त्यांच्याविषयी अफवा पसरवणारी झुंड 

स्वत:च्या शरीराचं ‘रोबोटीकरण’ आणि मेंदूचं ‘एआय’ प्रोग्रामिंग करून घेतलेला यंत्रसमुदाय 

हे कुठल्या विदेशी सिनेमातल्या वा व्हिडीओ गेममधल्या माणसांचं वर्णन नाही की परदेशातील किंवा परग्रहावरील एखाद्या रानटी समाजाचं नाही. हे आपलंच वर्णन आहे. हे कुणाला अतिरेकी, टोकाचं आणि खूप नकारात्मक वाटू शकतं.

कालपर्यंत ‘मध्यमवर्ग’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या तुम्हाआम्हा सगळ्यांची ही आजची अवस्था आहे. खरं तर कालपर्यंत चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही अर्थांनी ज्याला ‘मध्यमवर्ग’ म्हटलं जात होतं, तो गेल्या दहा वर्षांत तंत्रज्ञान नावाच्या काळपुरुषानं गिळंकृत केलाय. नव्वदच्या दशकात या वर्गाला ‘सुबत्तेच्या विषाणू’ने ग्रासले होते, पण आताच्या तंत्रज्ञानानं त्याचा फार धुव्वा उडवलाय. आता त्याला ‘निरुपयोगी वर्ग’ याच नावानं ओळखायला हवं. उपयोगाचा कुणाच्याच नाही, पण सर्वांच्याच ‘मुळा’वर उठवलेला वर्ग म्हणजे हा आजचा ‘निरुपयोगी वर्ग’.

हा वर्ग माणसांशी समोरासमोर संवाद करत नाही. त्यासाठी त्याला सोशल मीडिया लागतो. हा वर्ग कुठल्याही ऐतिहासिक, पौराणिक वा सांप्रत घटनेबाबतची माहिती ‘व्हॉटस्अॅप ट्विटर फेसबुक युनिव्हर्सिटी’मधून मिळवतो. या वर्गाला कुठलाही प्रश्न वा समस्येबाबत एकच दृष्टिकोन माहीत असतो, तो म्हणजे उजव्या बाजूचा. या वर्गाला फक्त याच डोळ्यानं दिसू लागलं आहे. त्याचा डावा डोळा पूर्ण निकामी झालाय बहुधा. त्यामुळे कुठल्याही प्रश्नाची ही एकच – तीही सरकारपुरस्कृत – बाजू त्याला माहीत असते. खरं तर त्याला दुसरी बाजू जाणून घेण्याची इच्छाही नसते आणि मूळ प्रश्न वा समस्या नेमकी काय आहे हेही.

राजकीयदृष्टय़ा इतका कमालीचा ‘निरक्षर’ – तोही मुळात सुशिक्षित असलेला – वर्ग तयार करण्यासाठी कुठल्याही सत्ताधाऱ्यांना कितीतरी जुलूम-जबरदस्ती करावी लागली असती; खूनखराबा, अन्याय-अत्याचार, हिंसाचार-रक्तपात करावा लागला असता. ‘ाढांती-प्रपांती‘च्या नावाखाली असे प्रकार इतिहासकाळात जगातल्या काही राज्यकर्त्यांनी केलेही आहेत. तर असं काहीही न करता नेमका तोच परिणाम साधणारा हा समाज ‘तंत्रज्ञाना’नं तयार केलाय.

एकमेकांशी ‘कनेक्ट’ होण्यासाठी आणि ‘कनेक्टिव्हिटी’ बरकरार ठेवण्यासाठी ‘सोशल मीडिया’चा जगभर गवगवा केला गेला, पण या मीडियाची ताकद लक्षात येताच त्या त्या देशाच्या सत्ताधाऱ्यांनी त्याला साम-दाम-दंड-भेद या नीतीचा बडगा दाखवून आपल्या फायद्यासाठी राबवायला सुरुवात केली. त्यातून राजकीयदृष्टय़ा ‘निरक्षर’, सामाजिकदृष्टय़ा ‘बधिर’, आर्थिकदृष्टय़ा ‘अहंकारी’, सांस्कृतिकदृष्टय़ा ‘बेपर्वा’ अशा एका वर्गाची निर्मिती झाली, तो म्हणजे कालचा ‘मध्यमवर्ग’ आणि आजचा ‘निरुपयोगी वर्ग’.

हा वर्ग माणसांत राहत नाही, तो सतत मोबाइलमध्ये तोंड खुपसून बसलेला असतो. हा वर्ग शॉपिंग मॉल्स, पब, हॉटेल्स या ठिकाणी ओसंडून वाहतो, पण कुठल्याही समस्येसाठी रस्त्यावर उतरून एखाद्या मोर्चात वा निदर्शनात सहभागी होत नाही. सकाळी चहाबरोबर त्याला वर्तमानपत्रं लागतं, पण चहा संपेपर्यंतच. कारण जगाची खबरबात वा बित्तंबातमी त्याला ‘व्हॉटस्अॅपट्विटरफेसबुक युनिव्हर्सिटी‘मधून मिळत राहतेच… क्षणोक्षणी, घडोघडी.

हिंदुस्थान ही लवकरच जगातली सर्वश्रेष्ठ महासत्ता होणार असल्यानं त्याच्या दृष्टीनं ‘इंडिया’ हेच ‘वर्ल्ड’ झालेलं आहे. त्यामुळे हिंदुस्थान कसा झपाटय़ानं पुढे जात आहे, प्रगती करत आहे, याच्या ‘न्यूज’ (बहुतांश ‘फेक’) वाचून त्याची छाती अभिमानानं फुलत राहते. ती तो ताठ मानेनं घरीदारी, कार्यालयात, मॉल-हॉटेल्स अशा सर्व ठिकाणी मिरवत राहतो.

पण त्याला तुम्ही ‘मॉब लिंचिंग’बद्दल विचारा, ‘लव्ह-जिहाद’बद्दल विचारा, आरक्षणाबद्दल विचारा, इतकंच काय, पण मणिपूरमधल्या हिंसाचाराबद्दल विचारा, तो एकदम त्वेषानं तुम्हालाच प्रश्न विचारेल – “हे याआधी कधी झालं नाही? ‘यांचे’ आधीच्या सत्ताधाऱ्यांनी अतोनात लाड केल्यामुळेच ते डोक्यावर बसले आहेत. त्यांना धडा शिकवण्याची गरज होतीच.”

जागतिकीकरणाचा सर्वात जास्त लाभधारक वर्ग हाच आहे. संपूर्ण बाजार व्यवस्था, मनोरंजनाची साधनं, सेवासुविधा यांचा उपभोग घेणाराही हाच वर्ग आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, प्रसारमाध्यमं यांवर सर्वाधिक प्रभाव असलेलाही हाच वर्ग आहे. जागतिकीकरणानंतर बदल, संधी, पैसा, सुख, स्वप्नपूर्ती ही स्थित्यंतरं अनुभवणाराही हाच वर्ग आहे. एकाच वेळी अचंबा, मत्सर, ईर्ष्या, असूया, हेवा, स्पर्धा, आदर, कौतुक, अनुकरणाची तीव्र मनीषा, तिरस्कार यांसारख्या परस्परविरोधी भावभावनांचा धनीही हाच वर्ग असतो.

याच वर्गाचं एकेकाळी ‘टुकीनं संसार’ आणि ‘नेकीनं नोकरी’ हे वैशिष्टय़ होतं. सामाजिक उत्तरदायित्व आणि बांधीलकी मानणाराही हाच समाज होता. समाजाचं जवळपास सर्व थरातलं नेतृत्व बव्हंशी याच वर्गातून पुढे येत होतं. नीतिमूल्यांची चाड, आस आणि आग्रह असलेलाही हाच वर्ग होता.

पण या सगळ्या गोष्टी आता ‘इतिहासजमा’ झाल्यात. नव्वदच्या दशकात तत्कालीन ‘मध्यमवर्ग’ नावाचा समाज बदलांच्या वावटळीत सापडला. त्यातून तो ‘संपन्न समाज’ (The Affluent Society) झाला खरा, पण ‘शहाणा समाज’ (The Sane Society) होण्याऐवजी ‘द रोबोटिक सोसायटी’ झालाय. कालपर्यंत ‘शहाणपण’ असलेल्या या समाजात आता केवळ ‘हुशारी’ शिल्लक राहिली आहे. ही हुशारी ‘स्व’चाच विचार करण्याला प्राधान्य देते आणि इतरांबद्दल ‘बेपर्वा, बेदरकार आणि बेफिकिरी’ याच शब्दांत व्यक्त होते.

एकोणिसाव्या शतकात उदयाला आलेल्या हिंदुस्थानी मध्यमवर्गाची ही लक्षणं कधीच नव्हती. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात तर नव्हतीच नव्हती. एकोणिसाव्या शतकातल्या ‘प्रबोधनपर्वा’चा उद्गाता, पुरस्कर्ता आणि पाठीराखा हाच वर्ग होता. त्यामुळे तो एक प्रकारे देशाचा ‘कणा’ होता. खरं तर ‘मध्यमवर्गीय संस्कृती’ त्याने टोपीवाल्यांकडून उचलली, पण नव्वदच्या दशकात त्या संस्कृतीवर ‘अमेरिकन संस्कृती’चा घनघोर हल्ला झाला आणि पाहता पाहता अमेरिकनांपेक्षाही ‘अमेरिकन संस्कृती’चा हा वर्ग पुरस्कर्ता झाला.

वैयक्तिक पातळीवर एकाकी, पण सामाजिक पातळीवर उन्मादखोर, आर्थिक पातळीवर विवंचनाग्रस्त, पण राजकीय पातळीवर आाढमक, शैक्षणिक पातळीवर गुणवान, पण सांस्कृतिक पातळीवर दिवाळखोर, व्यावहारिक पातळीवर संपन्न, पण बौद्धिक पातळीवर मूढ अशी या समाजाची आजची ‘अवस्था’ आहे.

जगाच्या आजवरच्या इतिहासात मध्यमवर्ग असा कधीच, कुठल्याच कालखंडात नव्हता. त्यामुळे जर मध्यमवर्गाचं कुठलंच लक्षण त्याच्यात नसेल तर त्याला ‘मध्यमवर्ग’ तरी कसं म्हणणार? कालच्या मध्यमवर्गाला तंत्रज्ञान नावाच्या आपदेनं, सोशल मीडिया नावाच्या विषाणूनं आणि व्हॉटस्अॅप विद्यापीठ नावाच्या अजगरानं गिळंकृत केलंय. त्याची जागा केवळ हात-पाय-कान-डोळे-जीभ शिल्लक असलेल्या, पण हे सगळेच अवयव निकामी झालेल्या ‘निरुपयोगी वर्गा’ने घेतलीय.

तुम्हाला पटो वा ना पटो, पण विद्यमान सत्ताधाऱ्यांपेक्षाही हा वर्ग हीच आजची खरी ‘डोकेदुखी’ झालेली आहे!

(लेखक ‘अक्षरनामा’ या मराठी डिजिटल डेली फीचर्स पोर्टलचे संपादक आहेत.)