साहित्यजगत – एका भन्नाटाचे स्मरण

>>रविप्रकाश कुलकर्णी

डोळय़ांसमोर अनेक गोष्टी असतात, पण त्याचे आकलन होईलच असे नाही. त्याकडे कुणी लक्ष वेधले की, कळते… अरेच्चा, आपल्याला कसे हे दिसले नाही?

मुंब्य्राकडून कळव्याकडे जाताना डाव्या बाजूला भलीमोठी शिळा असलेला डोंगर दिसतो. तो येता जाता कितीतरी वेळा पाहिला असेल. त्या आडव्या डोंगराकडे नीट पाहिले की, लक्षात येते, इथे शिवाची मूर्ती किंवा आकृती पहुडलेली आहे. मला तरी कित्येक दिवस कुठे माहीत होते? याकडे माझे लक्ष वेधले ते बाळ बेंडखळे यांनी. तेही सहजतेने जाता जाता त्यांनी दाखवलेली ही गोष्ट. त्यामुळे असेल, माझ्या मनात मुंब्य्राच्या डोंगराशी बाळ बेंडखळे यांचे नाव कायमचे जोडले गेलेले आहे.

गो. नी. दांडेकर यांच्या ‘दुर्ग भ्रमणगाथा’मध्ये अनेक ठिकाणी बाळचा संदर्भ येतो. हा बाळ म्हणजे हे बेंडखळे. थोडक्यात, भटक्या प्रवृत्तीची दीक्षा त्यांना आप्पा दांडेकरांकडून मिळाली. त्यावरून त्यांची जातकुळी कळावी. बाळ बेंडखळे यांनी ही दीक्षा कितीतरी जणांना दिली असणार. त्यात पुन्हा ते विद्यार्थीप्रिय शिक्षक असल्यामुळे कितीतरी विद्यार्थी त्यांच्या मागेपुढे नेहमीच असायचे. पुढे वयोपरत्वे बेंडखळे सर घरात स्थानबद्ध झाले. गेल्याच आठवडय़ात त्यांची मुलगी संघमित्रा बेंडखळे अकस्मात भेटली. तेव्हा मी विचारले, “काय म्हणतात बेंडखळे सर?”

 तेव्हा गोंधळून ती म्हणाली, “बाबा गेले.”

 “केव्हा?”

“28 ऑगस्ट 2022 ला.”

तिला पुढे बोलवेना. म्हणजे बेंडखळे सर जाऊन वर्ष होत आले आणि ही बातमी कुठेही येऊ नये? काय असेल ते असेल, पण बाळ बेंडखळे गेल्याची बातमी यायला हवी होती. विद्यार्थीप्रिय शिक्षक, एक ट्रेकर, चित्रकार, फोटोग्राफर, कॅलिग्राफी तज्ञ, अनवट गोष्टींचा संग्रह करणारा, असे बेंडखळे एक चांगले कवीसुद्धा होते.

डोंबिवलीच्या काव्य रसिक मंडळात ते हमखास कविता वाचायला यायचे आणि प्रेक्षकांची दाददेखील मिळवायचे. त्यांच्या एका कवितेतील ओळी आठवतात…

काय झाले? कसे झाले? 

इतिहास सारे झाडून झाले 

काही गोष्टी जुळून आल्या 

काही गोष्टी जळून गेल्या 

राखल्या काही, सोसल्या काही 

बोलल्या नाही, चालल्या नाही 

जागीच सारे पडून गेले… 

निसर्गात रमलेल्या, रममाण झालेल्या या कवीच्या कवितासंग्रहाचे नाव होते ‘पावस फूल.’ बेंडखळय़ांबरोबर चालणे म्हणजे त्यांना जे जे सौंदर्य दिसेल त्याचा आस्वाद घेण्यासारखे असायचे. या छांदिष्ट माणसाला किती गोष्टींत रस असावा? त्यांनीच सांगितले, “यापुढे तर मजाच आली. गोनीदांचं ‘भक्तिमार्ग प्रदीप’ पुस्तक आलं. त्यात सर्व दैवतांची रेखाचित्रे माझी होती. तेव्हा त्यांना कळलं, मला चित्रकलेत गती आहे. शिवकालावरच्या कादंबरीतून गोव्याजवळच्या सप्तकोटेश्वर देवालयाच्या जीर्णोद्धाराचा उल्लेख आहे. तिथला शिलालेख त्यांनी माझ्याकडे पाहिला तेव्हा त्यांना कळले, शिलालेखांच्या मुद्रिताचे काम मी आवडीने करतो. नाणी, शस्त्र, मूर्ती, जुन्या हस्तलिखितांची आवड, पाषाणांचे नमुने, लेण्यांचे शोधन, पाली, ब्राह्मी लेखासमवेतचे पाण्याचे साठे, अन्न शिजवण्याच्या तऱ्हा, अडचणीचे रस्ते, श्वापदांच्या सहवासाच्या गोष्टी आप्पाला कळायला वीस-बावीस वर्षे लागली. तोपर्यंत त्या माझ्या पोतडीत पडून होत्या.”

त्यातलेच एक अजब म्हणजे बेंडखळय़ांचे भुयार प्रेम! त्यांच्याएवढी भुयारे आजपर्यंत कोणी शोधली असतील किंवा पाहिली असतील याची शंकाच आहे. विहिरीतील, तळघरातील, किल्ल्याच्या तटातील, बुरुजातील, साठवणीतील भुयार, डोंगराच्या आरपार जाणारे एखादे नैसर्गिक भुयार. असे कितीतरी भुयारे त्यांनी शोधली आणि त्याचा शेवटपर्यंत ठाव घेतला. त्यांनी म्हटलेय, “मरणगंधापासून चैतनगंधापर्यंत सारं सारं भुयारात असू शकतं.”

त्यांचे हे वेड किती टोकाचे असावे? लग्नाच्या दुसऱया दिवशी हा माणूस हातखंब्याच्या भुयारात नि:शस्त्र वाघ बघायला गेला होता. असे भन्नाट अनुभव ऐकावेत ते त्यांच्याकडूनच. हा अनुभव अनेकांपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी ‘भुयार’ नावाचे पुस्तक लिहिले. अशा प्रकारचे मराठीतील हे एकमेव पुस्तक असावे. असा हा गुणी माणूस वयाच्या 86 व्या वर्षी वयोपरत्वे गेला. आता ही बातमी जाणत्या लोकांपर्यंत जावो.  डोंबिवलीकर कलावंतांची कदर करण्याकरिता सुप्रसिद्ध आहेत. नरेंद्रनाथ केरोपंत बेंडखळे तथा बाळ बेंडखळे यांची आठवण जपून ठेवायला पाहिजे.  वेगळाच हा माणूस होता.