सातारा जिल्हय़ाला ‘रेड अलर्ट’

दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून रौद्ररूप धारण केल्याने सातारा जिह्याच्या पश्चिम भागात हाहाकार उडायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे जिह्यात आंबेनळी, कुंभार्ली घाटांत, तसेच महाबळेश्वर-तापोळा मार्गावर दरडी कोसळल्या असून, वाहतूक ठप्प झाली आहे. महाबळेश्वरचा वेण्णा तलाव ओसंडून वाहू लागल्याने महाबळेश्वर-पाचगणी रस्ताही जलमय झाला आहे. कोयना धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील धुवाँधार पावसामुळे धरणात 24 तासांतच 6 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. अनेक छोटय़ामोठय़ा नद्या, ओढय़ा-नाल्यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाटणमध्ये संततधार सुरू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱया कराड-चिपळूण महामार्गावर कुंभार्ली घाटात सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. चिपळूण विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाने हा दरडीचा भाग तातडीने काढल्याने दोन तास ठप्प असलेली वाहतूक सुरू झाली. कोयना नदीवरील मुळगाव पुलाला पाणी टेकल्याने हा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोयना, पाटण, चाफळ, मोरगिरी, तारळे, ढेबेवाडी आदी विभागांत नद्या, ओढे-नाले यांचे पाणी शेतात घुसल्याने शेतीपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोयना विभागातील दुर्गम ठिकाणी वसलेल्या नाव येथील रस्त्यावर दरड कोसळल्याने नाव, मळे, कोळणे, पाथरपुंज गावांचा रस्ता बंद झाला आहे.

कोयनेत दिवसात 6 टीएमसीने वाढ

n कोयना धरणाच्या पाणलोटक्षेत्रात धुवाँधार पाऊस सुरू असून, गेल्या 24 तासांत धरणात तब्बल 5.71 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. पाणीसाठय़ात 24 तासांत 10 फूट 7 इंचांची वाढ झाली असून, पाणीसाठा 34.03 टीएमसी झाला आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत कोयनानगरला 158 मि.मी., नवजाला 307, महाबळेश्वरला 231 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

आंबेनळी घाटात दरड कोसळली

n महाबळेश्वरपासून कोयनेपर्यंतच्या पश्चिम घाटात रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. आंबेनळी घाटात चिरेखिंडीजवळ दरड कोसळल्याने महाबळेश्वर ते पोलादपूर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महाबळेश्वरला महाड नाक्यावर हा रस्ता बंद केला आहे. महाबळेश्वर ते तापोळा रस्त्यावर चिखली गावाजवळ आज दुपारी दरड कोसळल्यामुळे हा मार्गही ठप्प झाला आहे. दोन्ही ठिकाणी दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.