सरकारी संकेतस्थळावरील राजकीय नेत्यांचे फोटो हटवा; मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरात लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू केली आहे. त्याची सर्व सरकारी यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सरकारी संकेतस्थळावरील राजकीय व्यक्तींची छायाचित्रे हटविण्यात यावीत. तसेच शासकीय विश्रामगृहाचा वापरही नियंत्रित करण्यात यावा, असे निर्देश मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श आचारसंहिते संदर्भात विविध शासकीय कार्यान्वयीन यंत्रणांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पालिका, बेस्ट, आरोग्य, विद्यापीठ, महाविद्यालय, मुंबई शहर जिल्हाअंतर्गत असलेली सर्व शासकीय कार्यालयाचे प्रतिनिधी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सर्व शासकीय कार्यालयातील सर्व प्रचार प्रसिद्धीचे साहित्य, बॅनर्स, हार्ंडग्ज, काढण्यात यावेत. कोनशिला झाकण्यात याव्यात. तसेच सार्वजनिक मालमत्तांवरील राजकीय प्रचार प्रसिद्धीचे साहित्य काढण्यात यावे. संबंधित अधिकाऱयांनी सर्व प्रसार प्रसिद्धीचे साहित्य काढल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विविध विकास कामे सुरू असलेल्या कार्यान्वयीन यंत्रणांनी सुरू असलेल्या कामांची यादी आवक, जावक नोंदवहीच्या पानाच्या झेरॉक्स प्रतीसह निवडणूक विभागाला सादर करावी, अशा सूचना संजय यादव यांनी या वेळी दिल्या.

– निवडणुकीच्या कामात आपल्या स्तरावर हलगर्जी होणार नाही याची सर्व संबंधितांनी काळजी घ्यावी. सर्व यंत्रणांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार त्वरीत कार्यवाही करावी.

– आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल याची दक्षाता घ्यावी. आपल्या भागात आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी संबंधितांनी काळजीपूर्वक आपले कर्तव्य पार पाडावे.

उपनगर जिल्ह्यात निवडणुकीसाठी दहा निरीक्षक
लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात दहा निरीक्षक असतील. त्यात सर्वसाधारण, खर्च निरीक्षक आणि कायदा व सुव्यवस्था संदर्भातील देखरेखीसाठी निरीक्षक असतील. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम आणि मुंबई उत्तर-मध्य या मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात असेल, तर मुंबई उत्तर-पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय विक्रोळी येथे असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.