मध्य रेल्वे मालामाल! एकाच महिन्यात 350 कोटी रुपयांनी महसूल वाढला

मध्य रेल्वे जुलै महिन्यात मालामाल झाली आहे. प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीच्या माध्यमातून जुलैमध्ये तब्बल 1481 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षाचा विचार करता सुमारे 350 कोटी रुपयांची महसुलात वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात प्रवाशांना स्थानकात आणखी चांगल्या सुविधा मिळू शकणार आहेत.

रेल्वेने सध्या महसूलवाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार जुलैमध्ये प्रवासी वाहतुकीतून 653 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून मालवाहतुकीतून 728 कोटी, इतर घटकांच्या वाहतुकीतून 50 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मध्य रेल्वेच्या जुलै महिन्यातील महसुलात 30 टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे. तर तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून 3 लाख 34 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मालवाहतूक वाढली

रेल्वेने एका महिन्यात 6.83 लाख मेट्रिक टन एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मालवाहतूक केली आहे. मागील वर्षी 5.15 लाख मेट्रिक टन मालाची वाहतूक केली होती.

वर्षभरात 1 लाख वाहनांची वाहतूक

मध्य रेल्वेने गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 1 लाख 2 हजार नव्याकोऱया वाहनांची वाहतूक केली आहे. त्यामुळे रेल्वेची तब्बल 159 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. तसेच ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजच्या खर्चातही मोठी बचत झाली आहे. रेल्वेने वाहनांची वाहतूक सहजपणे करता यावी म्हणून विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिटची स्थापना केली आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला त्यांनी उत्पादित केलेल्या गाडय़ा सहजपणे बाजारपेठेपर्यंत रेल्वे वॅगनच्या माध्यमातून पोहोचवणे शक्य होत आहे. मुंबई विभागातील कळंबोली, नागपूर विभागातील अजनी, भुसावळ विभागातील नाशिक रोड, सोलापूर विभागातील दौंड व विलाड आणि पुणे विभागातील खडकी, चिंचवड, मिरज आणि लोणी येथे वाहने रेल्वे वॅगनमध्ये लोडिंग केली जातात.