ही दोस्ती तुटायची नाय… S-400 योग्य वेळेतच हिंदुस्थानला देणार; रशियाचे आश्वासन

अमेरिकेच्या दबावाला न जुमानत हिंदुस्थानने रशियाशी संरक्षण करार केला. तसेच रशियाकडून शस्त्रास्त्रे आणि तेल खरेदेतही हिंदुस्थानने पुढाकार घेतला. अमेरिकेला न जुमानता हिंदुस्थानने धाडसी निर्णय घेतल्याने रशियाही आता ही दोस्ती निभावणार आहे. युक्रेन युद्धामुळे रशियावर अनेक निर्बंध असतानाही हिंदुस्थानने रशियाला मदतीचा हात दिला. त्यामुळे आता रशिया हिंदुस्थानला S 400 या हवाई संरक्षण प्रणालीचे योग्य वेळेत वितरण करणार आहे. युक्रेन युद्धामुळे शस्त्रास्त्र निर्मितीवर परिणाम झाला असला तरी योग्य वेळेत ही प्रणाली हिंदुस्थानला देण्यात येईल, असे आश्वासन रशियाने दिले आहे.

युक्रेन युद्धाच्या आणि परिणामांच्या पार्श्वभूमीवर रशिया हिंदुस्थानशी मैत्री निभावणार आहे. रशियाने आपल्याला S-400 विमानविरोधी प्रणाली वेळेवर देण्याचे आश्वासन दिले आहे. इंटरफॅक्स वृत्तसंस्थेला सोमवारी एका वरिष्ठ रशियन संरक्षण निर्यात अधिकाऱ्याने ही माहिती दिली. हिंदुस्थान हा जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश आहे. हिंदुस्थान अनेक पारंपारिक शस्त्रांसाठी रशियन तंत्रज्ञानाचा वापर करतो, परंतु युक्रेनमधील रशियाच्या युद्धामुळे शस्त्रे आणि उपकरणे नियोजित वितरणास विलंब होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच याबाबतची चिंता नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत होती. मात्र, आता ही चिंता मिटली आहे.

S-400 विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीचे उत्पादन वेळेनुसार केले जात आहे. त्यामुळे ही प्रणाली योग्य वेळेत हिंदुस्थानात पोहचेल, असे रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी-टेक्निकल कोऑपरेशनचे प्रमुख दिमित्री शुगाएव यांनी सांगितले. हिंदुस्थानने 2018 मध्ये S-400 ट्रायम्फ एअर डिफेन्स सिस्टम युनिट्स 5.4 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केली. यापैकी तीन सिस्टीम वितरित करण्यात आल्या असून आणखी दोन प्रलंबित आहेत. इंटरफॅक्सच्या म्हणण्यानुसार, 2024 च्या अखेरीस हे वितरण पूर्ण होणार आहे. आपल्या हवाई दलाने मार्चमध्ये म्हटले होते की युक्रेनमधील युद्धामुळे रशियाकडून महत्त्वपूर्ण संरक्षण पुरवठ्याला विलंब होऊ शकतो. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार, 2017 पासून भारताने शस्त्रास्त्रांच्या आयातीवर खर्च केलेल्या 18.3 अब्ज डॉलर्सपैकी रशियाचा वाटा अजूनही 8.5 अब्ज डॉलर्स आहे.