सामना अग्रलेख – वावड्या आणि रेवड्या! ‘चार ट्रिलियन’चा फुगा

पाच ट्रिलियनचा फुगा अजून हवेतच आहे. चार ट्रिलियनच्या किती जवळ आपली अर्थव्यवस्था पोहोचली आहे हेदेखील स्पष्ट नाही. तरीही सत्तापक्षातील उतावीळ नवऱ्यांनी चार ट्रिलियन इकॉनॉमीचे ‘बाशिंग’ गुडघ्याला बांधून घेतले. चार ट्रिलियनच्या समाजमाध्यमांवरील ‘वावड्या’ बघून हुरळून गेलेल्या सत्ताधारी मंडळींनी आनंदाने ‘रेवड्या’ खाल्ल्या. मात्र या वावड्या आणि रेवड्यांनी मोदी सरकारचे पितळच उघडे पाडले. हेच घडणार होते, कारण खोटे बोल, पण रेटून बोल आणि जुमलेबाजी या मोदी सरकारच्या न वाजणाऱ्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यावरच त्यांची ‘वाऱ्यावरची वरात’ वाजतगाजत सुरू असते. अशा स्थितीत हवा नसलेला चार ट्रिलियनचा फुगा हवेत सोडला गेला, तर त्यात नवल काय?

भारतीय अर्थव्यवस्था ‘पाच ट्रिलियन डॉलर्स’ची करणारच, असे फुगे केंद्रातील मोदी सरकार ‘च’वर जोर देत उठता-बसता सोडत असते. हे फुगे जमिनीवर येऊ नयेत म्हणून अधूनमधून त्यात ‘हवा’ भरण्याचे उद्योगही सत्ताधारी मंडळी आणि त्यांचे अंधभक्त करीत असतात. असाच एक उद्योग काही केंद्रीय मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांनी सोमवारी केला आणि नेहमीप्रमाणे तो त्यांच्या अंगलट आला. भारतीय अर्थव्यवस्थेने ‘चार ट्रिलियन डॉलर्स’चा टप्पा ओलांडल्याबद्दल केंद्रातील मोदी सरकारचे परस्पर अभिनंदन करणाऱ्या ‘पोस्ट’ या मंडळींनी समाजमाध्यमांवर टाकल्या आणि नंतर त्या डिलिट करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. आशा तऱ्हेने फुगविलेल्या बेटकुळ्यांतील हवा स्वतःच काढून टाकावी लागली. खरे म्हणजे या चार ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेबाबत अद्यापि मोदी सरकार, त्यांचे अर्थ मंत्रालय किंवा राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने कुठलाही अधिकृत खुलासा केलेला नाही. सरकारमधीलच काही उच्च अधिकारी आणि काही अर्थतज्ञांनी भारतीय अर्थव्यवस्था अजून चार ट्रिलियन डॉलर्सच्या

टप्प्यात आलेली

नाही असे सांगितले आहे. तरीही त्यावरून केंद्र सरकारच्या अभिनंदनाच्या पोस्ट ‘जोर-शोर से’ टाकल्या गेल्या. त्यात आपल्या राज्याच्या ‘एक फुल, दोन हाफ’ सरकारचे ‘सीनियर उप’देखील होते. राज्याच्या गृहमंत्र्यांनी अशा बिनआवाजाच्या पिपाण्या जरूर वाजवाव्यात, परंतु जरा महाराष्ट्रकडेही लक्ष द्यावे. सध्या राज्यात कधी नव्हे एवढी जातीय अशांतता आणि अस्थिरता आहे, त्यात ठिणगी टाकायचे उद्योग सत्तेतीलच काही मंडळींकडून सुरू आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे रोजच समोर येत आहे. अकोला येथे एका चिमुरडीवर झालेला अत्यंत निर्घृण अत्याचार त्याचाच पुरावा आहे. तेव्हा राज्याच्या गृहमंत्र्यांनी ‘चार ट्रिलियन’च्या फुग्यात जरूर हवा भरावी, पण आधी ‘पंक्चर’ झालेल्या राज्यातील कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे. कारण भारतीय अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सची झाली आहे की नाही, ती त्याच्या किती जवळ किंवा दूर आहे, यापेक्षा सध्या राज्य ज्या वेगाने अस्थिरता आणि अनागोंदीच्या काळोखात जात आहे त्याकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे आहे. भारताची अर्थव्यवस्था चार-पाच काय, अगदी

सहा ट्रिलियन डॉलर्सची

झाली तर आनंदच आहे. तसे अधिकृतपणे जाहीर होईल तेव्हा संपूर्ण देशालाच त्याचे कौतुक वाटेल, परंतु तसे काही नसताना चार ट्रिलियनचा ‘स्वर्ग’ गाठण्याचा उद्योग सत्ता पक्षाने केला तो त्यांच्या नेहमीच्या सवयीनुसार. वास्तविक, पाच ट्रिलियनचा फुगा अजून हवेतच आहे. चार ट्रिलियनच्या किती जवळ आपली अर्थव्यवस्था पोहोचली आहे हेदेखील स्पष्ट नाही. तरीही सत्तापक्षातील उतावीळ नवऱ्यांनी चार ट्रिलियन इकॉनॉमीचे ‘बाशिंग’ स्वतःच गुडघ्याला बांधून घेतले. चार ट्रिलियनच्या समाजमाध्यमांवरील ‘वावड्या’ बघून हुरळून गेलेल्या सत्ताधारी मंडळींनी आनंदाने ‘रेवड्या’ खाल्ल्या. मात्र या वावड्या आणि रेवड्यांनी मोदी सरकारचे पितळच उघडे पाडले व स्वतःच्या पोस्टस् डिलिट करण्याची वेळ त्यांच्यावर आणली. हेच घडणार होते, कारण खोटे बोल, पण रेटून बोल आणि जुमलेबाजी या मोदी सरकारच्या न वाजणाऱ्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यावरच त्यांची ‘वाऱ्यावरची वरात’ वाजतगाजत सुरू असते. अशा स्थितीत हवा नसलेला चार ट्रिलियनचा फुगा हवेत सोडला गेला, तर त्यात नवल काय?