सामना अग्रलेख – गाझापट्टीतील बालसंहार!

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात दर 10 मिनिटाला एका लहान मुलाचा मृत्यू होतो आहे. चार हजारांहून अधिक लहान मुले या युद्धात मारली गेली. इस्रायलने पॅलेस्टाईन निर्वंश करण्याचा कट आखला आहे काय? महासत्तेची बटीक बनलेल्या युनायटेड नेशन्ससारख्या आंतरराष्ट्रीय संघटना गाझापट्टीतील हा बालसंहार रोखण्यासाठी काय करीत आहेत? गाझापट्टीच नव्हे तर माणुसकी बेचिराख करणारे हे युद्ध थांबवण्यासाठी कोणीच पुढाकार का घेत नाही? पॅलेस्टिनींचा निर्वंश करण्याचे मनसुबे पूर्ण झाल्याशिवाय यात हस्तक्षेप करायचा नाही, असे आंतरराष्ट्रीय समुदायाने ठरवले आहे काय?

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने अमानुषता व क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. युद्धाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. 33 दिवसांपासून सुरू असलेल्या या रक्तरंजित संघर्षात रोजच माणुसकीचा मुडदा पडतो आहे आणि जगभरातील तमाम देश या भीषण नरसंहाराकडे हतबलपणे पाहत आहेत. महिनाभराच्या युद्धात पॅलेस्टिनींची मोठी प्राणहानी झाली. मात्र जे ताजे भयंकर वास्तव समोर आले आहे ते काळीज पिळवटून टाकणारे आहे. युद्धात दर 10 मिनिटाला पॅलेस्टाईनच्या एका मुलाचा मृत्यू होत आहे. शिवाय दर 10 मिनिटाला दोन मुले जखमी होत आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून जेवढे पॅलेस्टिनी ठार झाले, त्यापैकी निम्मी संख्या ही लहान मुलांची आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत 9 हजार 770 पॅलेस्टिनी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेले. यापैकी जवळपास निम्मी म्हणजे 4100 एवढी लहान मुले होती. युद्धामध्ये जखमी झालेल्या आठ हजारहून अधिक पॅलेस्टिनींमधील निम्मी संख्या ही लहान मुलांचीच आहे. गंभीर जखमींपैकी अनेक लहान मुले मरणासन्न अवस्थेत आहेत. इस्रायलच्या 24 तास आग ओकणाऱया हवाई हल्ल्यांमध्ये जे पॅलेस्टिनी मृत्युमुखी पडले त्यामध्ये 70 टक्के मुलं, महिला आणि वृद्ध आहेत, अशी माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. युद्ध हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असले तरी ज्या पद्धतीने लहान-लहान मुलांची सामूहिक हत्याकांडे व शिरकाण घडविले जात आहे ते पाहून जगातील मातब्बर देशांच्या हृदयाला पाझर कसा फुटत नाही?

युनायटेड नेशन्ससारखी

आंतरराष्ट्रीय संस्था युद्धकाळात नेमकी काय करीत आहे? पॅलेस्टाईन व इस्रायलच्या खुनी संघर्षात रोज शेकडो लोक मृत्युमुखी पडत असताना जागतिक पातळीवरील वेगवेगळय़ा संघटना कोणत्या पाताळात दडून बसल्या आहेत? युद्धाची कळ आधी हमासने काढली व आता इस्रायलदेखील अंगात सैतान संचारल्यागत दररोज बॉम्बहल्ले करून हमासच्या ताब्यात असलेली गाझापट्टी उद्ध्वस्त करीत सुटला आहे. गाझापट्टीवर एकही पॅलेस्टिनी माणूस जिवंत सोडायचाच नाही, अशी शपथच इस्रायलने घेतली आहे की काय, असा प्रश्न पडावा इतके हे हल्ले भयंकर आहेत. इस्रायल व पॅलेस्टिनी यांच्यात गेली अनेक दशके आडवा विस्तवही जात नाही. पॅलेस्टिनी-इस्रायलींना घुसखोर मानतात, तर इस्रायल पॅलेस्टिनींना दहशतवादी मानतो. दोन्ही देशांमध्ये सीमावाद तर आहेच, पण वर्षानुवर्षे असलेले वैर काळागणिक वाढत जाऊन युद्धाचा हा भयंकर भडका उडाला. आग आधी हमासने लावली, हे मान्य करावेच लागेल. कुठलेही तत्कालिक कारण वा निमित्त घडलेले नसताना हमासने इस्रायलची भव्य संरक्षण व्यवस्था भेदून इस्रायलवर हजारो रॉकेट्स डागले. सीमेवरील शहरांत घुसून हमासच्या अतिरेक्यांनी सुमारे 1400 इस्रायली नागरिकांना ठार केले. अत्यंत निर्घृणपणे लहान मुले, स्त्र्ाया, वृद्ध यांनाही दयामाया न दाखवता हमासच्या अतिरेक्यांनी गोळय़ा झाडून वा धारदार शस्त्र्ाांनी गळे चिरून ठार केले. स्त्र्ायांवर भयंकर अत्याचार केले. बलाढय़ इस्रायलवर

असा हल्ला

कोणी करू शकेल याचा जगाने कधी विचारही केला नव्हता. जगातील सर्वात अत्याधुनिक शस्त्र्ासामग्री व सर्वोत्कृष्ट हेरगिरी यंत्रणा सारे काही विफल झाले व हमासच्या भयंकर हल्ल्याने इस्रायलला चकित केले, मात्र नंतर सावरलेल्या इस्रायलने हमासपेक्षा हजार पटीने अधिक भीषण हल्ले पॅलेस्टिनींचे वर्चस्व असलेल्या गाझापट्टी भागात चालवले आहेत. इस्रायलची लढाऊ विमाने 24 तास गाझापट्टीवर घिरटय़ा घालत आहेत. हमासची ठिकाणे शोधून तिथे क्षेपणास्त्र्ाs तर डागली जात आहेतच; शिवाय निवासी वस्ती, रुग्णालये, मदत व बचावकार्यासाठी उभारण्यात आलेले तात्पुरते निवारे, राहुटय़ांमध्ये आश्रयाला आलेली लहान मुले व स्त्र्ाया अशा ठिकाणांना वेचून लक्ष्य केले जात आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या महासंहारक युद्धात दररोज निष्पाप मुलांचे बळी जात असताना जगातील मातब्बर देशांनी डोळय़ाला झापडं बांधून या क्रौर्याकडे दुर्लक्ष करावे, हे संतापजनक आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात दर 10 मिनिटाला एका लहान मुलाचा मृत्यू होतो आहे. चार हजारांहून अधिक लहान मुले या युद्धात मारली गेली. इस्रायलने पॅलेस्टाईन निर्वंश करण्याचा कट आखला आहे काय? महासत्तेची बटीक बनलेल्या युनायटेड नेशन्ससारख्या आंतरराष्ट्रीय संघटना गाझापट्टीतील हा बालसंहार रोखण्यासाठी काय करीत आहेत? गाझापट्टीच नव्हे तर माणुसकी बेचिराख करणारे हे युद्ध थांबवण्यासाठी कोणीच पुढाकार का घेत नाही? पॅलेस्टिनींचा निर्वंश करण्याचे मनसुबे पूर्ण झाल्याशिवाय यात हस्तक्षेप करायचा नाही, असे आंतरराष्ट्रीय समुदायाने ठरवले आहे काय?