सामना अग्रलेख – लाल किल्ल्यावरून…

सध्या पंतप्रधान आणि गृहमंत्री एकाच राज्याचे आहेत. याआधी पंतप्रधान भाजप अध्यक्ष हे एकाच राज्याचे होते. सर्व सूत्रे अंमलबजावणीचे अधिकार आपल्याच हाती असावेत याचउदात्तहेतूने हे सर्व सुरू आहे. हे घराणेशाहीचेच रूप आहे. देशातील न्याययंत्रणा, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा, राष्ट्रपती वगैरे घटनात्मक संस्था आज दहशतीच्या टाचेखाली आहेत. घराणेशाहीचे राज्य असताना लोक इतके भयग्रस्त कधीच नव्हते. आज लाल किल्लाही भयग्रस्त अस्वस्थ असेल. त्यामुळेलाल किल्ल्यावरून मोदी यांचे हे शेवटचे भाषण आहेही लालू यादवांची भविष्यवाणी ही 140 कोटी लोकांची, स्वातंत्र्य संग्रामातील शहीद आत्म्यांची शापवाणी ठरू शकेल!

देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला, पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय संबोधन केले, त्यात नवे काय होते? तेच, तेच आणि तेच. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीस दहा वर्षे होत आली व लाल किल्ल्यावरचे त्यांचे हे नववे भाषण. मोदी व शहांनी घेतल्याच तर देश सार्वत्रिक निवडणुकांना सामोरा जाईल. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळय़ात सांगितले की, “लाल किल्ल्यावरून मोदींचे हे शेवटचे भाषण आहे.’’ श्री. लालू यादव जे बोलले ते खरे ठरो, लालू यादवांच्या तोंडात साखर पडो अशा प्रकारच्या भावना देशाच्या गावागावांत आहेत. लाल किल्ल्यावर 2024 चा तिरंगा मोदी फडकवणार नाहीत असे एकंदरीत वातावरण आहे. लालू यादव यांनी त्यांचे मत स्पष्टपणे मांडल्यामुळे त्यांच्या घरावर ‘ईडी’च्या धाडी नव्याने पडू शकतील व एखाद्या खोटय़ा गुन्ह्यात अडकवून यादव कुटुंबाचा छळ केला जाईल. गेल्या दहा वर्षांपासून आपल्या देशात यापेक्षा वेगळे काहीच घडत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी लोकशाहीच्या पिपाण्या वाजवणे, तिरंगा फडकवून भाषणे देणे हा एक उपचार झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात 140 कोटी लोकसंख्येचा उल्लेख केला. आपला देश लोकसंख्येच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर असल्याचे पंतप्रधानांनी अभिमानाने सांगितले. देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकसंख्या 40 कोटी होती. 77 वर्षांत आपण 140 कोटींवर पोहोचलो, पण 140 कोटी जनता स्वातंत्र्य मिळाल्याचे सुख खरोखर भोगत आहे काय? मोदी यांनी जनतेला असे आश्वासन दिले की, ‘मला पुन्हा एक संधी द्या. मी तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करेऩ’ मात्र यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये दिलेल्या आश्वासनांचे व जनतेला दाखविलेल्या स्वप्नांचे काय झाले? ते आधी सांगा. पंतप्रधान मोदी 90 कोटी लोकांना फुकट रेशन देतात. त्या फुकट रेशनसाठी जनता भिकेचा कटोरा घेऊन रांगेत व रांगत उभी राहते. हेच

विकास आणि प्रगतीचे लक्षण

मानायचे काय? लोकांना असे पंगू करणे हे स्वातंत्र्य नाही. पंतप्रधान येतात आणि जातात, पण मोदी यांना मिळालेला दहा वर्षांचा काळ हा निंदानालस्ती, विरोधकांना त्रास देण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या शोधणे व अमलात आणणे यातच गेला. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, राजीव गांधी, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी हे आपला ठसा उमटवून गेले. अनेक नेत्यांना मोदी यांच्या तुलनेत कमी कालखंड मिळाला, पण या सर्व नेत्यांचे राजकीय कर्तृत्व सरस होते. मोदी यांना साधारण दहा वर्षांचा प्रदीर्घ कालखंड मिळाला, पण त्यांच्या हातून कोणतेही महान कार्य खरेच घडले काय ते शोधावे लागेल. राजकीय विरोधकांच्या टिंगलटवाळय़ा करण्यातच त्यांनी वेळ घालवला. या वेळी मोदी यांनी मणिपूरच्या हिंसाचाराचा उल्लेख लाल किल्ल्यावरील भाषणात केला. मणिपुरात लवकरच शांतता प्रस्थापित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, पण मणिपूरच्या प्रश्नावर संसदेत विरोधक प्रश्न विचारत होते तेव्हा मणिपूरवर भूमिका मांडण्यासाठी पंतप्रधान मोदी संसदेत फिरकले नाहीत. मोदींना मणिपूरवर बोलते करण्यासाठी संसदेत अविश्वास ठराव मांडावा लागला. मोदी मणिपूरसारख्या संवेदनशील विषयावर नाइलाज म्हणून लाल किल्ल्यावरून बोलले. ते बोलले नसते तर पुन्हा त्यांच्यावर हल्ले झाले असते. मोदी हे लोकशाही व संसदीय परंपरा मानायला तयार नाहीत, पण देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर जाऊन तिरंगा फडकवतात. कारण त्यांच्यासाठी तो एक ‘इव्हेन्ट’ ठरतो. मंगळवारच्या लाल किल्ल्यावरील भाषणात ‘‘मी पुन्हा येईन व 2024 ला मीच तिरंगा फडकवेन’’ असे मोदींनी जाहीर केले. हा त्यांचा अहंकार आहे. ‘‘पुन्हा येईन’’ सांगणाऱ्यांची पुढे काय हालत होते ते त्यांनी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांकडे पाहून शिकायला हवे. मोदी पुढे म्हणाले की, आज घराणेशाही व चाटूगिरीने आपला

देश बरबाद

केला आहे. एखाद्या राजकीय पक्षाची सूत्रे फक्त एकाच परिवाराकडे कशी काय असू शकतात? मोदी यांनी त्यांच्या स्वभावानुसार हा हल्ला काँग्रेस व गांधी कुटुंबावर केला. दहा वर्षे सत्ता भोगूनही मोदी हे काँग्रेस व गांधी परिवाराच्या गुंत्यात अडकून पडले आहेत. त्यांच्या मनातून गांधी व काँग्रेस जात नाही व लाल किल्ल्याच्या इतिहासावर नेहरूंचा असलेला ठसा त्यांना स्वस्थता लाभू देत नाही. काँग्रेसचे अध्यक्ष आज गांधी कुटुंबाबाहेरचे आहेत. सोनिया गांधी यांनी राजकारणातून जवळ जवळ निवृत्ती पत्करली आहे. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे की, आपल्याला पंतप्रधान होण्याची इच्छा नाही. संपूर्ण देश हाच माझा परिवार आहे. “मैं आपको भारत माता की रक्षा करते हुए मिलुंगा, जहा भी भारत मातापर आक्रमण होगा, मैं वहा आपको खडा मिलुंगा’’ असे श्री. राहुल गांधी सांगत आहेत व यात घराणेशाही कोठे आहे? प्रियांका गांधी या देशभरात दौरे करून लोकांना हुकूमशाहीविरोधात जागे करीत आहेत. घराणेशाहीचा शिरकाव हा भारतीय जनता पक्षात झाला आहे व ही घराणेशाही भाजपने काँग्रेसकडूनच घेतली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर चिरंजीव खासदार, नारायण राणे केंद्रीय मंत्री तर चिरंजीव खाली आमदार. देशभरात प्रत्येक महत्त्वाच्या पदावर आज गुजरातमधूनच माणसे भरली जातात. हीसुद्धा एक प्रकारची घराणेशाहीच आहे. सध्या पंतप्रधान आणि गृहमंत्री एकाच राज्याचे आहेत. याआधी पंतप्रधान व भाजप अध्यक्ष हे एकाच राज्याचे होते. सर्व सूत्रे व अंमलबजावणीचे अधिकार आपल्याच हाती असावेत याच ‘उदात्त’ हेतूने हे सर्व सुरू आहे. हे घराणेशाहीचेच रूप आहे. देशातील न्याययंत्रणा, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा, राष्ट्रपती वगैरे घटनात्मक संस्था आज दहशतीच्या टाचेखाली आहेत. घराणेशाहीचे राज्य असताना लोक इतके भयग्रस्त कधीच नव्हते. आज लाल किल्लाही भयग्रस्त व अस्वस्थ असेल. त्यामुळे ‘लाल किल्ल्यावरून मोदी यांचे हे शेवटचे भाषण आहे’ ही लालू यादवांची भविष्यवाणी ही 140 कोटी लोकांची, स्वातंत्र्य संग्रामातील शहीद आत्म्यांची शापवाणी ठरू शकेल!