सामना अग्रलेख – ‘पनौती’ म्हणजे काय रे भाऊ?

पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये दोन भावांचा संवाद गाजला होता. त्यातील धाकटा भाऊ मोठ्या भावाला ‘दारू म्हणजे काय रे भाऊ?’ असे विचारत असे. हा संवाद पु. ल. त्यांच्या खुमासदार शैलीत रंगवून सांगत. आपल्या देशात सध्या त्याच पद्धतीने ‘‘पनौती म्हणजे काय रे भाऊ?’’ हा संवाद रंगला आहे. त्याला कारण ठरला अहमदाबाद येथील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताचा पराभव. आता हा पराभव कोणाच्या ‘पनौती’मुळे झाला की कुठल्या ‘पापी’ ग्रहांमुळे, यावर ज्योतिष्यांनी जरूर खल करावा. सर्वसामान्य जनता मात्र 2014 पासून देशाच्या पाठीमागे लागलेल्या ‘पनौती’बद्दल गांभीर्याने विचार करीत आहे, एवढं मात्र खरं!

निवडणूक आयोगाचा फोलपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पंतप्रधान मोदी व भाजप परिवारावर टीका केल्याबद्दल निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. लोकशाहीत टीकेस महत्त्व आहे, पण मोदी युगात ‘टीका’ हा अपराध ठरला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील निवडणूक प्रचार सभांत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘पनौती’ आणि ‘खिसेकापू’ असा केला. त्यामुळे भाजपवाले खवळले व त्यांनी निवडणूक आयोगास कारवाई करण्यास भाग पाडले. निवडणूक आयोग हा भाजप आयोगच झाला असल्याने अशा कारवायांचे आश्चर्य वाटायला नको. राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेत मिश्कील शैलीत सांगितले की, ‘‘पीएम म्हणजे पनौती मोदी. ते क्रिकेट सामना पाहायला गेले आणि आपण पराभूत झालो. भारतीय संघ चांगला खेळत होता, पण पनौतीमुळे आपण हरलो.’’ राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना ‘पनौती’ म्हटले व ‘पनौती’ शब्दाचे विश्लेषण केले. ‘पनौती’ म्हणजे नकारात्मक व्यक्ती किंवा संकटकाल. भाजप ज्यास अमृतकाल वगैरे म्हणत आहे तो संकटकाल आहे व त्याचा पनौतीशी संबंध आहे. ‘साडेसाती’, ‘पनौती’, ‘छोटी पनौती’ हे शब्द भाजपच्या नवहिंदू संस्कृतीशी संबंधित आहेत. मोदी हे काशीचे प्रतिनिधित्व करतात. तेव्हा काशीच्या ‘पंडित’ मंडळींना बोलावून पंतप्रधानांनी पनौतीचे सत्य समजून घेतले पाहिजे. मात्र ‘पनौती’ शब्द भाजपच्या काळजात घुसला व ते घायाळ झाले, पण याच मोदी व शहा यांनी याआधी काँग्रेस, गांधी परिवाराचा उल्लेख ‘राहू-केतू’, ‘राहुकाल’ असा केला आहेच! राहुल गांधी हे ‘पप्पू’ व ‘मूर्खांचे सरदार’ आहेत, अशी दूषणे लावली गेली तेव्हा निवडणूक आयोग भाजप कार्यालयात डोळ्यांवर गोधडी ओढून झोपी गेला होता काय? देशाला ‘पनौती’ लागली आहे व त्या पनौतीपासून राहुल गांधीच मुक्ती देऊ शकतील या विश्वासात लोक आहेत, तर श्री. राहुल गांधी हे पंतप्रधानांना शिवीगाळ करीत असल्याचा भाजपचा आक्षेप आहे व ‘पनौती’ शब्द त्याच

शिव्यांचा भाग

आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र अनेक संदर्भ ‘पनौती’बाबत वेगळ्याच गोष्टी सांगतात. नेपाळचेच उदाहरण घेतले तर नेपाळसारख्या हिंदू राष्ट्रातील ‘पनौती’ मंदिर प्रख्यात असून तेथील पनौती देवस्थान हिंदूंसाठी लाभदायक असल्याने तेथे पनौती उत्सव साजरा केला जातो असा संदर्भ आहे. फार दूर कशाला, नाशिकमध्येदेखील ‘श्री पनवती हरण हनुमान मंदिर’ आहे हे कदाचित फार कोणाला माहीत नसावे. मात्र तेथे जाऊन अनेक श्रद्धाळू हनुमानाला साकडे घालतच असतात. त्यामुळे राहुल गांधी यांनी ‘पनौती’ म्हटले याबद्दल छाती पिटण्याचे कारण काय? जे राहुल गांधी यांनी म्हटले तेच जोरकसपणे ममता बॅनर्जी यांनीही म्हटले. विश्वचषकाची फायनल कोलकाता किंवा मुंबईत झाली असती तर टीम इंडिया जिंकली असती, पण फायनल मॅचला ‘पापी’ पोहोचले म्हणून भारतीय खेळाडू हरले. ममता बॅनर्जी यांच्या विधानावर भाजप आयोगाचे काय म्हणणे आहे? ‘पनौती’, ‘खिसेकापू’ हे शब्द आयोगास खुपले, पण मध्य प्रदेश, राजस्थानात भाजपास मते देणाऱ्यांना रामलल्लांचे मोफत दर्शन घडवू असे अमित शहा यांनी जाहीर सभांमधून सांगितले. त्यांचे असे धर्माच्या नावावर मते मागणे हे निवडणूक आयोगास खुपत नाही. शिवसेनेने याबाबत निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार नोंदवूनही त्यावर कारवाई होत नाही. कारण निवडणूक आयोगालाही ‘पनौती’ची बाधा झाली आहे. पंतप्रधानांनी अतिश्रीमंतांना कर्जमाफी केली. गेल्या नऊ वर्षांत मर्जीतल्या उद्योगपतींना दिलेली 14 लाख कोटींची कर्जमाफी म्हणजे गरीबांचे खिसे कापण्याचा प्रकार आहे. अस्मानी-सुलतानीच्या तावडीत सापडलेल्या देशातील गरीब शेतकऱयांसाठी ही पनौती नाहीतर काय आहे? जवळच्या मूठभर उद्योगपतींवर हजारो कोटींच्या कर्जमाफीची मेहेरबानी करणारे मोदी सरकार गरीब शेतकऱयांच्या खिशात मात्र वर्षाकाठी जेमतेम सहा हजार रुपये देते, वर त्याचा प्रचंड गाजावाजा करते. हा प्रकार शेतकऱयांच्या पनौतीवर सरकारी

मीठ चोळण्यासारखाच

आहे. महाराष्ट्रातही मागील दीड वर्षापासून ‘मिंधे’ सरकार आल्यापासून राज्यातील उद्योगांना गळती लागली आहे. अनेक मोठे उद्योग सत्ताधाऱयांच्या ‘नाकाखालून’ मोदी-शहांच्या गुजरातमध्ये पळविले जात आहेत. त्यात पावसाची अवकृपा आणि अवकाळीचा फटका यामुळे खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामावरही ‘पनौती’ आली आहे. अनेक गावांच्या पाठी दुष्काळ आणि पाण्याच्या टँकरची ‘पनौती’ हिवाळ्याच्या सुरुवातीलाच लागली आहे. विकृत आणि सुडाच्या राजकारणाची पनौती सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसली आहे. दिल्लीश्वरांनी महाराष्ट्राच्या बोकांडी बसविलेले सध्याचे ‘एक फूल दोन हाफ’ सरकार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली ‘पनौती’च आहे. विरोधी पक्ष फोडायचे आणि त्या जोरावर ठिकठिकाणी आपली सरकारे बसवायची ही भाजप राजवटीत देशावर आलेली पनौतीच आहे. मात्र त्यावरून जर विरोधक उद्या काही बोलले तर त्यांना निवडणूक आयोगाची नोटीस जाऊ शकते. कारण मोदी सरकारविरोधात बोलणाऱ्या राजकीय विरोधकांना नोटिसा बजावणे हाच निवडणूक आयोगाचा उद्योग बनला आहे. राहुल गांधींना आलेली ‘पनौती’ शब्दाबद्दलची नोटीस हा त्याचाच पुरावा आहे. पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये दोन भावांचा संवाद गाजला होता. त्यातील धाकटा भाऊ मोठय़ा भावाला ‘दारू म्हणजे काय रे भाऊ?’ असे विचारत असे. हा संवाद पु. ल. त्यांच्या खुमासदार शैलीत रंगवून सांगत. आपल्या देशात सध्या त्याच पद्धतीने ‘‘पनौती म्हणजे काय रे भाऊ?’’ हा संवाद रंगला आहे. समाजमाध्यमांवर त्यावरून ‘ट्रेण्डिंग’ सुरू आहे. त्याला कारण ठरला अहमदाबाद येथील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताचा पराभव. आता हा पराभव कोणाच्या ‘पनौती’मुळे झाला की कुठल्या ‘पापी’ ग्रहांमुळे, यावर ज्योतिष्यांनी जरूर खल करावा. सर्वसामान्य जनता मात्र 2014पासून देशाच्या पाठीमागे लागलेल्या ‘पनौती’बद्दल गांभीर्याने विचार करीत आहे, एवढं मात्र खरं!