खिचडी घोटाळ्यामागे मिंधे गटाचा नेता? गुन्हा दाखल असूनही अद्याप कारवाई नाही

मुंबई पालिकेतील तथाकथित खिचडी घोटाळाप्रकरणी कारवाई करत ईडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव सूरज चव्हाण यांना अटक केली. मात्र या घोटाळ्याचे खरे सूत्रधार हे वेगळेच असून फक्त दबावाच्या राजकारणासाठी चव्हाण यांना अटक केल्याचा दावा केला जात आहे. कोरोना काळातील तथाकथित खिचडी घोटाळाप्रकरणी आधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत होती. त्यानंतर हा तपास ईडीकडे देण्यात आला. ईडीने मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती. हा तपास मुंबई पोलिसांकडे असताना पोलिसांनी फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसविरोधात गुन्हा दाखल केला होता. या कंपनीचे मालक हे सध्या मिंधे गटात असलेले संजय म्हशीलकर असल्याचे माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीतून उघड झाले आहे. म्हशीलकरांची दोन मुले प्रीतम आणि प्रांजल हे या कंपनीत भागीदार आहेत.

खिचडी घोटाळ्यातील पोलिसांनी ज्या फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे, त्या कंपनीचा मूळ व्यवसाय हा विटा आणि वाळू विक्रीचा आहे. ही कंपनी सुरक्षारक्षक सेवा पुरवण्याचेही काम करते. या कंपनीकडे कंत्राटासाठी आवश्यक असणारा अन्न, औषध आणि आरोग्य विभागाचा परवानाही नव्हता. कंपनीने बेकायदेशीरपणे कंत्राट मिळवले. इतकंच नाही, तर अन्न पदार्थ तयार करण्याचे आणि पुरवण्याचे कामही ही कंपनी करत नाही असे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस कंत्राट देण्यासाठी पात्र नसतानाही या कंपनीला कंत्राट देण्यात आले. यासाठी मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांनीच त्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. इंडीयन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.