शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची आज अकोल्यात जाहीर सभा

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ उद्या (दि. 26) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांची अकोले येथे दुपारी 4 वाजता जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिली.

गेल्या महिन्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी अकोलेसह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद यात्रा काढली होती. याला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला होता. आता भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराचा झंझावात सुरू झाला आहे. गेल्या आठवडय़ात शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या वेळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

आता उद्या (दि. 26) शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची अकोले येथे सभा होणार आहे. सभेपूर्वी शिवसेना पदाधिकाऱयांची बैठक होणार आहे, असेही जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी सांगितले.