भाजप, मिंध्यांच्या चिल्लर कार्यकर्त्यांनाही बंदुकधारी पोलिसांचे संरक्षण; सर्वसामान्य जनता वाऱ्यावर! – संजय राऊत

मुंबई महाराष्ट्राची राजधानी असून मुंबईसह महाराष्ट्रातील संपूर्ण पोलीस खाते गद्दार आमदार, खासदार आणि पक्ष सोडून गेलेल्यांच्या सुरक्षेमध्ये तैनात आहे. गल्लीतील एखादा माणूसही मिंधे किंवा अजित पवार गटात गेला तर त्याच्या सुरक्षेसाठीही बंदुकधारी पोलीस ठेवले आहेत. पोलीस खाते अशा पद्धतीने राबवले जात असून भाजप, मिंध्यांच्या चिल्लर कार्यकर्त्यांनाही पोलीस संरक्षण मिळत आहे. मात्र सामान्य जनता वाऱ्यावर आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावर रविवारी पहाटे गोळीबार झाला. याबाबत प्रश्न विचारला असता खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सलमान खानसंदर्भात झालेला गोळीबार हा इशारा नसून या गोळ्यांनी भाजप सरकारची पोलखोल केली आहे. गृहमंत्री राजकारात अडकले असून ते विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणए, त्यांच्या मागे यंत्रणा लावणे यात मग्शुल आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलीस आयुक्त काय करत आहेत? ते राजकीय व्यक्ती नाहीत. त्याचे मुंबईवर लक्ष आहे की नाही? की ते सुद्धआ भाजप, गृहमंत्री, सरकारच्या पालख्या वाहत आहेत? असा सवाल करत मुंबईतील लोकल ट्रेन, रस्ते, सार्वजनिक ठिकाणीही परिस्थिती वाईट असल्याचे राऊत म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला. ज्यांनी संविधानाची हत्या केली, लोकशाहीचा मुर्दा पाडला त्यांच्या तोंडून संविधान रक्षणाची भाषा म्हणजे एक ढोंग आहे. त्यांनी आजचा दिवस निवडला कारण इंडिया आघाडीने संविधान बचावचा नारा दिला असून लोकं जागरूक होत आहेत. या भीतीपोटीच त्यांनी आजचा दिवस निवडला, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

ठाकरेंची शिवसेना खरी

असली-नकली शिवसेना असे विधान करून संभ्रम निर्माण करणाऱ्या भाजप नेत्यांचाही राऊत यांनी समाचार घेतला. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हीच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. ठाकरेंचीच शिवसेना खरी आहे. भाजपच्या मनात आणि पोटातील भीती त्यांच्या विधानातून दिसते. इतके प्रयत्न करूनही ठाकरेंची शिवसेना संपली जात नाही आणि आमच्या छाडावर बसली आहे या भीतीतून अशी विधाने सुरू असल्याचे ते म्हणाले.