रोखठोक – विष्णूचे तेरावे अवतार व ईव्हीएमचे शस्त्र!

भारतीय लोकशाही ‘ईव्हीएम’मुळे संकटात आली. संपूर्ण जगाने ‘ईव्हीएम’ रद्द केले, पण मोदी-शहांनी ईव्हीएमशी आघाडी केली ती अतूट आहे. लोकशाही वाचवायची असेल तर ‘मतपत्रिका’ची निवडणूक व्हायला हवी. श्रीमान मोदी हे श्रीरामाचे बोट पकडून राममंदिरात निघाले. ते विष्णूचे तेरावे अवतारही आहेत. मग मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याचे इतके भय का?

योध्येतील राममंदिराचे भव्य उद्घाटन 22 जानेवारी रोजी होईल. देशाच्या दृष्टीने हा आनंद सोहळा आहे. पंतप्रधान मोदी या आनंद सोहळ्याच्या केंद्रस्थानी राहतील व त्या सोहळ्यानंतर लगेच भाजप लोकसभा निवडणुकांच्या दिशेने पावले टाकेल. श्रीरामाच्या धर्म सोहळ्याच्या तरंगत्या वातावरणातच लोकांकडून मतदान करून घ्यावे, असा विचार भाजपच्या प्रमुख नेत्यांनी केला असेल तर त्यात चुकीचे काहीच नाही. मोदी व शहा हे सर्व निर्णय ‘वेळ’ आणि ‘मुहूर्त’ पाहून घेतात. 30 एप्रिलनंतरचा काळ भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांसाठी शुभ नाही, असे एका चांगल्या ज्योतिषाने टीव्हीवर येऊन सांगितले. त्यामुळे लोकसभा निवडणुका 30 एप्रिलच्या आधी आटोपून चांगला मुहूर्त साधावा असे घडू शकेल, पण तरीही 30 एप्रिलच्या नंतरचा अशुभ काळ ते कसा टाळणार? काळ गोठवण्याची किमया व ललाटावरचे भाग्य-अभाग्य बदलण्याचे तंत्र कोणाकडेच नाही. झाले तेवढे पुरे. देश एकदाचा भाजपमुक्त होवो, अशा भूमिकेत जनता आहे.

मंदिर सोहळ्याचा घाट

राममंदिर सोहळ्यानंतर देश लोकसभा निवडणुकांना सामोरा जाईल. त्यासाठीच मंदिर सोहळ्याचा घाट घातला गेला आहे. या संपूर्ण सोहळ्यात ‘फोकस’ फक्त पंतप्रधान मोदींवर राहील अशी योजना आहे. रामाचा आधार व ‘ईव्हीएम’ची मदत अशा दोन पायांवर भाजपचा यशाचा डोलारा उभा आहे. विकासाच्या नावाने बोंब आहे. समाजातला कोणताही घटक सुखी नाही. हा अस्वस्थ समाज भाजपास मतदान करीत नाही. तरीही भाजप जिंकतो. त्यासाठी लोकसभा निवडणुकीआधी ईव्हीएमचा निकाल लावा. 2024 च्याही निवडणुका ‘ईव्हीएम’वर घेतल्या गेल्या तर मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकून दाखवतील, असे सॅम पित्रोदांसारखे तज्ञ सांगत आहेत. पित्रोदा हे राजकारणी नाहीत. राजीव गांधी यांच्या काळात जी ‘टेलिकम्युनिकेशन’ क्रांती झाली त्याचे सूत्रधार पित्रोदा होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात अर्थ आहे. मध्य प्रदेश विधानसभेचा निकाल ज्या पद्धतीने लागला ते पाहून देशातील मतदारांचा या निवडणूक पद्धतीवरील विश्वास उडाला. शिवराजसिंह चौहान यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री पदावर दावा सांगता येऊ नये अशा पद्धतीने मध्य प्रदेशचे निकाल लावण्यात आले. भाजपास मध्य प्रदेशात 163 जागा मिळणे शक्यच नव्हते. हा चमत्कार ‘ईव्हीएम’मुळे झाला हे आता सगळेच सांगतात. हे सर्व अगदी सहज घडवले जाते. लोकसभा आणि विधानसभेतील 30 ते 35 टक्के मतदारसंघांतील ‘ईव्हीएम’चे हॅकिंग केले जाते. ईव्हीएम सोर्स कोड (Source Code) चे स्वतंत्र ऑडिटिंग झाले तर मशीनचा घोटाळा उघड होईल. ईव्हीएम हॅकिंग करून भाजप गेली काही वर्षे जिंकत आहे. त्यांना जिंकण्याची व मोदी यांच्या चमत्काराची, दैवी शक्तीची इतकी खात्री असेल तर मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला हव्यात. भाजप त्या कधीच घेणार नाही.

सगळे ‘हॅक’ होते

दूरसंचार क्षेत्रात काम करणारे एक तज्ञ मला भेटले. ते म्हणाले, “एका OTP मुळे एखाद्याचे संपूर्ण बँक खाते हॅक होऊ शकते. पृथ्वीवरील रिमोटने चंद्रयान, मंगलयान नियंत्रण करता येऊ शकते तर मग ईव्हीएम किस झाड की मूली?’’ भारतात ईव्हीएमवर निवडणुका घेणे हा धोका आहे. मतपत्रिकेवरच निवडणुका घ्यायला हव्यात. जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत भाजप आहे. ईव्हीएमवर विश्वास ठेवता येणार नाही, असे सॅम पित्रोदा का म्हणतात ते समजून घ्या.

  • ईव्हीएम पूर्णपणे टेक्निक आणि टेक्नोक्रॅटसच्या पकडीत आहे आणि टेक्नोक्रॅटस् अशा सरकारच्या पकडीत आहेत ज्याचा लोकशाहीवर विश्वास नाही. लोकशाहीवर कब्जा मिळविण्यासाठीच ईव्हीएमचा वापर केला जात आहे. ईव्हीएमला आपल्या पद्धतीने नियंत्रित करणे शक्य आहे.
  • भारतात सध्या वापरात असलेल्या ईव्हीएम पूर्ण ‘निर्दोष’ नाहीत  (stand alone) हे उघड झाले आहे.
  • ईव्हीएम मशीनबरोबर जेव्हा व्हीव्हीपाट मशीन जोडले गेले तेव्हा मूळ समस्येत जास्त भर पडते. व्हीव्हीपाट हे वेगळे ‘डिव्हाईस’ आहे. त्यात हार्डवेअर व साफ्टवेअरचा समावेश आहे.
  • व्हीव्हीपाटला ईव्हीएमशी जोडण्यासाठी एका स्पेशल कनेक्टरचा उपयोग केला जातो. त्याला एसएलयू म्हटले जाते. या एसएलयूतच घोटाळा करण्याची क्षमता आहे.
  • एसएलयू कनेक्टरच व्हीव्हीपाटला सूचना देते की, कोणत्या बटणामुळे भाजपास मत मिळाले, कोणत्या बटणामुळे काँग्रेसला व कोणत्या बटणामुळे इतर पक्षांना मत मिळाले. मतदानापूर्वी हा ‘प्रोग्राम’ मशीनमध्ये टाकला जातो.
  • एसएलयू जोडल्यानंतर ईव्हीएम ही फक्त मतदानापुरतीच (stand alone) मशीन राहात नाही. त्या माध्यमातून इतर अनेक कामे करून घेतली जातात. ज्यावर सध्या संशय व चर्चा सुरू आहे.
  • व्हीव्हीपाट मशीनमधून जो कागद बाहेर पडतो तो सध्या थर्मल प्रिंटरमधून निघतो. तो चार-पाच दिवसच सुरक्षित राहतो. त्यावरची  शाई उडून जाते. त्या जागी अशा प्रिंटरचा वापर होणे गरजेचे आहे की, त्यातून बाहेर पडलेला कागद किमान दोन-चार महिने टिकून राहील. व्हीव्हीपाट रिसीटवर आपण कोणास मतदान केले ते दिसते.
  • ईव्हीएम घोटाळा होतोच ही पक्की खात्री आहेच व त्यामुळे भाजप ईव्हीएम हटवायला तयार नाही.
  • सॅम पित्रोदा यांचे म्हणणे आहे की, व्हीव्हीपाटची ईव्हीएममधून बाहेर येणारी रिसीट मतदाराच्या हातात पडावी. ती रिसीट त्याने दुसऱ्या स्वतंत्र ‘बॉक्स’मध्ये मतपत्रिका टाकतात तशी टाकावी. हा बॉक्स कोणत्याही इलेक्ट्रानिक डिव्हाईसशी जोडलेला नसावा. त्यानंतर बॉक्समधील शंभर टक्के ‘रिसीट’ची मोजणी व्हावी.
  • भारताचेच नव्हे तर जगातील सर्व दूरसंचार तज्ञ मान्य करतात की, ‘ईव्हीएम’मध्ये नक्कीच समस्या आहे. घोटाळा कसा केला जातो याची प्रात्यक्षिके होऊनही निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट ते मानायला तयार नाही. या प्रकरणी त्यांची भूमिका स्वच्छ नाही.

ईव्हीएम ही एक समस्या आहे व जगातील सर्व लोकशाही मानणाऱ्या देशांनी ‘ईव्हीएम’ पद्धती रद्द केली. मग भारतातच ईव्हीएमचा हट्ट का? मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राममंदिर उभे राहिले. रामाचे बोट पकडून मोदी अयोध्येतील मंदिरात निघाले आहेत अशी पोस्टर्स सर्वत्र लागली. ज्यांच्यात श्रीरामास आधार देण्याचे बळ आहे व ज्यांना विष्णूचे तेरावे अवतार असे म्हटले जाते ते ‘बॅलट पेपर’ म्हणजे मतपत्रिकेस का घाबरत आहेत? ‘ईव्हीएम’कांड करण्याचे एक तंत्र आहे. आधी ओपिनियन पोलच्या माध्यमांतून विजयाचे ढोल वाजवले जातात आणि प्रत्येक राज्यात जेथे ‘कांटे की टक्कर’ आहे अशा मतदारसंघांत गुन्हेगारी पद्धतीचा अवलंब करून मते मिळवली जातात. एखादे तेलंगणा, कर्नाटक सोडून दिले जाते, हा खेळ आहे.

‘ईव्हीएम’ कोठेच नाही

जगातील विकसित, आधुनिक व विज्ञानवादी राष्ट्रांत ईव्हीएमवर बंदी आहे. अमेरिकेत व इस्रायलमध्येही ‘बालट पेपर’वर विश्वास ठेवला जातो. इंग्लंड व फ्रान्ससारख्या राष्ट्रांनी ‘ईव्हीएम’चा उपयोग कधीच केला नाही. अमेरिका, नेदरलॅण्ड, जर्मनी, इटलीसारख्या राष्ट्रांनी ‘ईव्हीएम’चा उपयोग केला. पण नंतर ते बंद केले. ईव्हीएममध्ये सिक्युरिटी आणि आक्युरसी (सुरक्षितता आणि अचूकता) नाही हेच त्याचे कारण. ‘ईव्हीएम’ नसेल तर भाजपास नगरपालिका निवडणुकाही धड जिंकता येणार नाहीत. ईव्हीएम म्हणजेच भाजप, मोदी व शहा आहेत. लोकशाही वाचवायची असेल तर भाजपविरोधी पक्षांनी ईव्हीएमविरुद्ध एकवटायला हवे. भारतातील लोकशाहीचा हत्यारा म्हणजे ईव्हीएम आहे व ईव्हीएम देशात हुकूमशाहीची बीजे रोवत आहे. लोकशाही व देशभक्तीची चाड असणाऱ्या नागरिकांनी विशेषतः तरुणांनी रस्त्यावर आणि समाजमाध्यमांवर या प्रश्नी आंदोलन उभे करायला हवे. ‘ईव्हीएम’वर निवडणुका होणार असतील तर निवडणुकांवरच बहिष्कार टाकण्याची घोषणा करून भारतातील हुकूमशाहीकडे जगाचे लक्ष वेधून घेतले पाहिजे. ‘ईव्हीएम’च्या हेराफेरीत देश सापडला आहे. त्या हेराफेरीत या लोकांनी प्रभू श्रीरामासही गुंतवले. धार्मिक उन्मादाचे वातावरण निर्माण करून ते निवडणुकांना सामोरे जातील. या वेळी चारशे जागा जिंकू असे ते आज सांगतात. कारण ईव्हीएम त्यांच्या हाती आहे. जे विरोधक निवडून येतील त्यांना निलंबित करायचे व रिकाम्या संसदेत भाषणे करायची.

विष्णूच्या तेराव्या अवताराचे हे कार्य आहे!

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]