रोखठोक – पाच राज्यांतील चषक कोण जिंकेल?

अहमदाबादच्या ‘मोदी’ स्टेडियमवर भारत विश्वचषकाची लढाई हरला तेव्हा महाशक्तिमान मोदी-शहा त्या मैदानावरच होते. दुसरीकडे पाच राज्यांच्या विधानसभांचा धुरळा उडाला आहे. मोदी-शहांसमोर आव्हान गांधी व काँग्रेसचे आहे. कपटनीतीचा अवलंब सुरू आहे, पण मोदी-शहांसाठी निवडणूक सोपी नाही!

पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल देशासाठी निर्णायक ठरतील. पण पाच राज्यांचे निकाल हे ‘मोदी स्टेडियम’वरील विश्वचषक निकालाप्रमाणेच लागतील, अशी हवा आहे. 19 नोव्हेंबरला विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. अंतिम सामना अहमदाबाद येथे झाला. भारतीय संघ जिंकणारच अशा आत्मविश्वासाने पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे अंतिम सामना बघण्यासाठी स्टेडियमवर हजर होते. भारतीय संघ जिंकेल, पंतप्रधान मोदींच्या हस्ते विश्वचषक भारतीय संघास देण्याचा राजकीय सोहळा पार पडेल व ठरल्याप्रमाणे देशभरातील भाजप कार्यालयांसमोर विजयोत्सव साजरा केला जाईल, असे एकंदरीत नियोजन ठरलेच होते, पण आास्ट्रेलियाच्या संघाने ‘माती’ खाल्ली नाही असेच म्हणावे लागेल. त्यांनी असा खेळ केला की, भारतीय जनता पक्षाच्या मनसुब्यांवर सपशेल पाणी पडले. पाच राज्यांतील निवडणुकांचे निकालही अशाच पद्धतीने लागतील काय? पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे गेला महिनाभर राजधानी दिल्लीला वाऱ्यावर सोडून राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ व तेलंगणाच्या प्रचार दौऱयात गुंतून राहिले. देशासमोर अनेक समस्या आहेत, पण पाच राज्यांच्या निवडणुका जिंकणे यापलीकडे मोदी-शहांचे मन फिरताना दिसत नाही. पाच राज्यांत भाजपची स्थिती बरी नाही. श्री. मोदी हे 12 वर्षांपासून ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देत आहेत, पण त्याच काँग्रेसचे भूत वारंवार त्यांच्या मानगुटीवर बसते. त्यामुळे बेजार झालेला भाजप व मोदी पाच राज्यांत सर्व प्रकारचे जंतर मंतर करताना दिसत आहेत. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी मोदी-शहांसमोर आव्हान उभे केले तेव्हा मोदींनी ‘गांधीं’ना शह देण्यासाठी ‘ईडी’ला मैदानात उतरवले. काँग्रेस व गांधी परिवाराची मालकी असलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राची साधारण सहाशे कोटी रुपयांची मालमत्ता ‘ईडी’ने जप्त केली. हे आश्चर्यच आहे. हे असे केल्याने विधानसभा निवडणुकांत जय मिळेल असे त्यांचे ‘व्यापारी’ डोके आहे.

अंधभक्तांचे पीक

भाजपात अंधभक्तांचे पीक आले आहे, पण ही अंधभक्ती देशाला मारक आहे. मोदी यांना आमचा पाठिंबा हिंदुत्वासाठी आहे, असे सांगणारे पांढरपेशे लोक भेटतात तेव्हा आश्चर्य वाटते. जाती-धर्मातली तेढ, लोकशाहीचे पतन, एकाच उद्योगपतींचे धन वाढवणे यास हिंदुत्व मानणारे देशाचे शत्रू आहेत. धर्म म्हणजे काय ते या लोकांना समजले नाही व अंधभक्त सांगतील तो ‘धर्म’ असे आता सुरू आहे. कौरव आणि पांडवांचे युद्ध हे धर्मयुद्ध होते असे आजही मानले जाते. कौरव-पांडवांच्या युद्धाच्या आधी युधिष्ठिर एकटाच पायी रणांगण पार करून समोरच्या शत्रू सेनेत उभ्या असलेल्या आपल्या सग्या-सोयऱयांना युद्ध करण्याविषयी आज्ञा विचारायला जातो.

भीष्म पितामहांना प्रणाम करून तो विचारतो – “मला तुमच्याशी लढायचंय. युद्धाची आज्ञा व विजयाचा आशीर्वाद द्या.”

भीष्म पितामह उत्तर देतात, “या युद्धात माझं शरीर दुर्योधनाकडे राहील. कारण मी त्याचं अन्न खाल्लंय, पण धर्माने युक्त असलेलं माझं मन मात्र तुमच्याकडे असेल. ते तुमची मंगल कामना करेल. तुमच्या विजयाची आकांक्षा ठेवेल.”

युधिष्ठिरानं अशाच प्रकारे गुरू द्रोणाचार्यांना आणि कृपाचार्यांनाही वंदन केले. आज असे धर्म व योद्धे राहिले नाहीत. अहमदाबादच्या ‘मोदी’ स्टेडियमवर सरकारचे भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य येऊन बसले, पण त्यामुळे प्रत्यक्ष मैदानावरील योद्धय़ांच्या मनावर इतके दडपण आले की, ते पराभूत झाले. भारतीय जनता पक्षाने विजयोत्सवाची केलेली तयारी वाया गेली. या देशात जे काही बरे घडते आहे ते फक्त एकाच व्यक्तीमुळे, अशी अंधश्रद्धा पसरवली तरी क्रिकेट विश्वचषक आपण जिंकू शकलो नाही. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल मोदींच्या बाजूनेच लागतील याची गॅरेंटी नाही, कारण काँग्रेस पक्ष अद्यापि संपलेला नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाची झेप सुरू आहे.

काँग्रेस आहेच!

ज्या ‘काँग्रेसमुक्त भारता’चा नारा नरेंद्र मोदी यांनी दिला त्या मोदींची लढाई काँग्रेस पक्षाबरोबरच आहे व पाच राज्यांत मोदींसमोर काँग्रेसचेच आव्हान आहे. मिझोराम व तेलंगणा राज्यांत भाजप स्पर्धेतही नाही. तेलंगणात भाजप स्पर्धेत नसल्याने त्यांनी त्यांच्या मतदारांना संदेश दिला की, तेलंगणा राष्ट्रीय पक्षाला मते वळवा. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला विजयी होऊ देऊ नका. मोदी-शहांपेक्षा जास्त गर्दी राहुल आणि प्रियंका गांधींच्या सभांना होत आहे. एमआयएम, बसपासारख्या पक्षांशी भाजपचे आतून साटेलोटे आहे, ते काँग्रेसला अडथळे आणण्यासाठीच. याचा अर्थ मोदींच्या मनात काँग्रेसचे भय कायम आहे. मध्य प्रदेश, राजस्थान ही दोन्ही राज्ये महत्त्वाची. मध्य प्रदेशात काँग्रेसबरोबर दिल्लीतील भाजप नेत्यांना तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा पराभव करायचा आहे, पण महिला मतदारांत शिवराजसिंह चौहान लोकप्रिय आहेत. मध्य प्रदेशात याक्षणी कोणतीही लाट नाही, विचार नाही. घोषणा, आश्वासने, पैसा व सरकारी यंत्रणांचा मुक्त वापर यावर निवडणुका लढवल्या गेल्या. मध्य प्रदेशातील विजयाचे अंतर फार नाही, पण मध्य प्रदेशात मोदी-शहांचा घाम काँग्रेसने काढला हे नक्की. राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्य राहील की नाही हे निश्चित नाही, पण महाशक्तिमान मोदी यांना जयपुरात तळ ठोकावा लागला. काँग्रेसवर हल्ले करावे लागले. राहुल गांधी यांना दूषणे द्यावी लागली हेच काँग्रेसचे बलस्थान. राजस्थानात काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री श्री. अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यात जमत नव्हते, पण विधानसभा निवडणुकांत त्यांचे मनोमीलन झाले. आधी सत्ता, मग भांडणे असे त्यांनी ठरवले. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे महत्त्व राजस्थानच्या राजकारणात आहे व 30 विधानसभा उमेदवार शेवटी ‘राजें’च्या मनाप्रमाणे द्यावे लागले. कारण झालवाड विभागात काँग्रेसचे आव्हान आहे व मोदी-शहांपेक्षा तेथे ‘राजें’चा करिश्मा आहे. राजस्थानमध्ये काय होईल ते याक्षणी कोणीच सांगू शकणार नाही. ओपिनियन व एक्झिट पोल उडून जातील, असे चित्र आहे. ािढकेटचा विश्वचषक जिंकण्याचे नक्की होते. विजयानंतरच्या जल्लोषांची सर्व तयारी होती, पण शेवटी मैदानावर निकाल वेगळा लागला!

पाच राज्यांतील विजयाचा चषक कोण जिंकेल?

त्यावरच 2024 चे भविष्य टिकले आहे. देशात चांगलेच घडावे ही अपेक्षा!

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]