निवडणुका आल्याने प्रत्येक राज्यात पेटवापेटवीला सुरुवात, संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका

मणिपुरात हिंसाचाराची आग धुमसत असतानाच हरयाणामध्येही हिंसाचार उसळला. हरयाणातील नूंह जिह्यात सोमवारी ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर दगडफेक झाल्याने हिंसाचाराचा भडका उडाला. त्यानंतर अनेक भागांत हिंसाचाराचे लोण पसरले. जाळपोळ, दगडफेक आणि लुटालुटीचे प्रकार घडल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. निवडणुका जवळ आल्याने प्रत्येक राज्यात आता पेटवापेटवी सुरू असल्याचे राऊत यांनी म्हटले. भाजपची निवडणुकीच्या आधी खेळली जाणारी ही जुनी निती आहे आणि प्रत्येक राज्यात अशा प्रकारच्या दंगलींना सामोरे जावे लागेल अशी भीती राऊत यांनी बोलून दाखवली.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समारंभात बोलत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक केला होता असे म्हटले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी म्हटले की, “महाराष्ट्रावर संकट आले, महाराष्ट्राच्या भावना तुडवण्याचा प्रयत्न झाला. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राला कमजोर आणि अपमानित करण्याचा प्रयत्न झाला आणि जेव्हा जेव्हा रात्रीच्या अंधारात दिल्लीच्या शत्रूने महाराष्ट्रावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने सर्जिकल स्ट्राईक केला हे पवारांचे म्हणणे अत्यंत बरोबर आहे. पुढल्या सर्जिकल स्ट्राईकसाठी पवार हे आमच्यासोबत नक्कीच राहतील.

दिल्ली सेवा विधेयकाबाबत बोलताना राऊत यांनी या विधेयकाचा विरोध करणं का गरजेचे आहे हे सांगितले. ते म्हणाले की, तुम्ही नायब राज्यपालांच्या माध्यमातून निवडून आलेल्या सरकारांना काम करू देत नाही, त्यासाठी कायदा आणत आहात, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला काम करू द्यावे असा आदेश दिला आहे, तरीही आपण असे करत आहे. त्यामुळे मला वाटतं की देशात लोकशाही नाही. लोकशाही वाचवण्यासाठी या विधेयकाला विरोध करावा लागेल.