सत्तेत बसलेले बाजारबुणगे संविधानाच्या विरुद्ध काम करताहेत, संजय राऊत कडाडले

मुख्यमंत्री अपात्र ठरले तरी त्यांना विधानपरिषदेवर घेऊ आणि मुख्यमंत्रीपद टिकवू, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्या विधानाचा खरपूस समाचार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे. या वृत्तीला माज म्हणतात आणि हा माज जनता उतरवेल. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. फुले-शाहु-आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण अशी फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. हे बाजारबुणगे 10 वर्षांपूर्वी सत्तेत येऊन बसले आणि देशात व महाराष्ट्रात संविधानाच्या विरुद्ध काम करताहेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे.

पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. त्यांनी राज्यातल्या भ्रष्टाचारावर आणि मराठा आरक्षणाप्रति राज्य सरकारच्या धोरणावर निशाणा साधला. ‘भीमा पाटस कारखान्याच्या घोटाळ्याचा विषय संपलेला नाही. आम्ही आता त्याचीच चर्चा करत होता. नामदेवबापू ताकवडे या विषयावर सातत्याने लढताहेत. जोपर्यंत राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता आहे आणि दिल्लीत ईडी-सीबीआय भाजपच्या हातात आहे, तोपर्यंत यांना संरक्षण मिळत राहील. पण, 2024नंतर या राज्यात आणि देशात 100 टक्के बदल होतोय. तेव्हा हे सगळे लोक तुरुंगात जातील. जसं आता खोट्या प्रकरणावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं जातंय. यांची प्रकरणं तर खरी आहेत. मग दादा भुसेंचं 178 कोटींचं गिरणा सहकारी साखर कारखान्याचं प्रकरण असेल, विखे पाटलांचं प्रकरण, राहुल कुल यांचं प्रकरण असेल. या सगळ्यांशी आमचं वैयक्तिक भांडण नाही. जर तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांची प्रकरणं उकरून काढताय, तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना तुरुंगात टाकताय, धाडी टाकताय. मग हे कोण संत सज्जन लागून गेलेत, जे तुमच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. सरकार काही करत नाही. कारण, सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतंय. त्यांच्या मंत्रिमंडळात असे मंत्री आहेत. हसन मुश्रीफ यांचा एक पाय तुरुंगात होता. भावना गवळी किंवा स्वतः एकनाथ शिंदे, ज्यांचा एक पाय तुरुंगात होता अशांना तुम्ही सत्तेच्या मखरात बसवता म्हणजे हे भ्रष्टाचाराला सरळसरळ दिलेलं समर्थन आहे. आणि तुम्ही नीतीमत्तेच्या गप्पा येऊन शिर्डीत मारता. शरद पवारांवर टीका करता. आधी तुमच्याकडे काय नाडी लोंबतेय ते पाहा.’ अशी टीका राऊत यांनी केली.

‘हे महाराष्ट्रातलं सरकार बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकार आहे. राहुल नार्वेकर यांच्यावर विधानसभा अध्यक्ष म्हणून कुणी विश्वास ठेवणार नाही. त्यांनी आतापर्यंत चार पक्ष बदलले. ते शिवसेनेत होते, ते राष्ट्रवादीत होते, आता भाजपात आहेत, अधेमध्ये आणखी कुठेतरी होते. ज्यांना पक्षांतराविषयी चीड नाही किंवा पक्षांतर हाच ज्यांचा राष्ट्रीय धर्म आहे, त्यांना इतक्या पक्षांतराविषयी काय चीड असणार? ते काय न्याय देणार? हा पहिला मुद्दा. ते दिल्ली कशाकरता जातात? त्यांना काय गरज आहे दिल्लीत जाण्याची? ते भाजपच्या नेत्यांना भेटतात, ते मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा करतात. ज्यांच्यावर खटला चालू आहे, अशा आरोपीसोबत बंद दाराआड चर्चा करून, भेटून तुम्ही लोकांना काय संदेश देताय? त्याहीपेक्षा गंभीर गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, काल देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितलं. काय म्हणतात फडणवीस, समजा एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर आम्ही त्यांना ताबडतोब विधान परिषदेवर घेऊ आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद टिकवू. हे कोण सांगतंय, तर देवेंद्र फडणवीस. त्यांना खात्री आहे की ते अपात्र ठरताहेत. तरी आम्ही त्यांना अपात्र ठरल्यावर विधान परिषदेवर घेऊ आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद टिकवू. तुमच्याकडे एकनाथ शिंदेंचं मंत्रीपद टिकवायला तोडगा आहे. पण मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसलेत, महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे, तुमच्याकडे त्यांच्यासाठी तोडगा नाही. शिंदे आणि त्यांच्या टोळीला वाचवायला तोडगा आहे. शिंदे होतील विधान परिषदेवर मुख्यमंत्री, पण त्यांचे 40 आमदार अपात्र ठरतील त्याचं काय? त्या प्रत्येकाला तुम्ही विधान परिषदेवर घेऊन घटनाबाह्य पद्धतीने तुम्ही राज्य करणार आहात का? फडणवीस यांचं विधान धिक्कार करावा असं आहे. याचा अर्थ तुम्ही या देशातला कायदा, संविधान, नीतीमत्ता मानायला तयार नाही आणि भाजप नीतीमत्तेच्या बाबतीत इतका खाली घसरलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाचं ऐकायला तयार नाही.’

‘मुख्यमंत्री अपात्र ठरले तरी त्यांना विधान परिषदेवर घेऊ आणि पद टिकवू ही कसली मस्ती आहे? याला माज म्हणतात. हा माज 2024 साली जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही विधानसभा अध्यक्षांचा निर्णय सुद्धा मानणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मानणार नाही. तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना सतत पाठीशी घालणार आणि राज्य करणार. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. फुले-शाहु-आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण अशी फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. हे बाजारबुणगे 10 वर्षांपूर्वी सत्तेत येऊन बसले आणि देशात व महाराष्ट्रात संविधानाच्या विरुद्ध काम करताहेत’ असा घणाघात त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर केला.

‘मुळात तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय संदेश देताय? काही झालं तरी आम्ही सत्ता सोडणार नाही. कायद्याचं राज्य आणणार नाही. गृहमंत्र्याने कायद्याची भाषा बोलायला पाहिजे. गृहमंत्र्याने जनतेला कायदा, सुव्यवस्था, नियम आणि नीतीमत्ता यांचा संदेश दिला पाहिजे. पण तुम्ही पुन्हा पुन्हा घटनाबाह्य, बेकायदेशीर सरकारला संरक्षण देण्याची भाषा करताय. देवेंद्र फडणवीस तुम्हाला हे शोभत नाही. आज राज्य इतकं अस्थिर, अस्वस्थ आहे. गावागावांत उपोषणं सुरू आहेत, राजकीय नेत्यांना गावबंदी केलेली आहे, मंत्र्यांना धक्काबुक्की केली जातेय, आपण त्यावर बोलत नाही, पण शिंदेंना वाचवायला निघाला आहात. जरांगे पाटील यांना एक महिन्याची मुदत दिली होती. एक महिन्यापासून जरांगे पाटील मोकळे आहेत, त्यांना आपण चर्चेला बोलवलं का?, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

‘काल फडणवीस असंही म्हणाले की, मी ब्राह्मण असल्याने मला लक्ष्य केलं जातं. महाराष्ट्रात जातीपातीच्या संदर्भात अशी भाषा यापूर्वी कधी कुणी केली नव्हती. या महाराष्ट्राने बॅ. अंतुलेंसारखा मुसलमान मुख्यमंत्री स्वीकारला आहे, दलित मुख्यमंत्री स्वीकारलेला आहे. शिवसेनाप्रमुखांनी पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री राज्याला दिला, महाराष्ट्राने विरोध केला नाही. कारण कर्तबगारीला महत्त्व दिलं, जातीला नाही. महाराष्ट्र पुरोगामी आहे हे आपण म्हणतो, ते यासाठीच. महाराष्ट्र जातपातधर्म न मानता राजकारण-समाजकारणात काम करत आला आहे. तुम्हाला आताच आपण ब्राह्मण असल्याचं का आठवलं? आधी पाच वर्षं मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्य केलंत, तेव्हा असं बोलला नाहीत? तुमची कारस्थानं उघड झाल्यामुळे लोक तुम्हाला दुषणं देताहेत. म्हणून तुम्हाला असं वाटतंय. महाराष्ट्राला शूर ब्राह्मणांचा कायम गर्व आहे. वीर सावरकर, चापेकर बंधू, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके हे ब्राह्मणच होते, क्रांतिकारक होते. त्यांची आम्ही पूजाच करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात ब्राह्मण होते, मोरोपंत पिंगळे. त्यांच्या सैन्यात ब्राह्मण होते. लढणाऱ्या शूराला जात नसते, कारस्थानांना जात असते, असं राऊत यावेळी म्हणाले.