बिहारमध्ये ‘इंडिया’ आघाडीचे जागावाटप फायनल; राजद 26, काँग्रेस 9 आणि डावे 5 जागा लढवणार

बिहारमध्ये ‘इंडिया’ महाआघाडीचे जागावाटप अंतिम झाले असून लालूप्रसाद यादव यांचा राजद 26 जागा लढवणार आहे. काँग्रेस मागील निवडणुकीप्रमाणेच 9 जागा आणि डावे पक्ष 5 जागांवर लढणार आहेत. पाटणा येथील राजद कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. तेजस्वी यादव मात्र या वेळी अनुपस्थित होते.

पूर्णिया मतदारसंघ राजदकडे

पूर्णिया मतदारसंघ राजदकडे गेल्यामुळे पप्पू यादव यांची निराशा झाली आहे. खासदारकी मिळण्याच्या आशेने पप्पू यादव यांनी नुकताच काँग्रेसमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला होता, पण ही जागा राजदकडे गेली आहे. जेडीयूमधून राजदमध्ये आलेल्या विमा भारती या जागेवर महाआघाडीच्या उमेदवार असतील.

दिल्लीत चर्चामंथन, पाटण्यात घोषणा

दिल्लीत राजद आणि काँग्रेस नेत्यांमध्ये तीन दिवस चाललेल्या विचारमंथनानंतर जागावाटप निश्चित करण्यात आले. पाटण्यात राजद प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंग, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह, राजदचे नेते अब्दुल बारी सिद्दीकी, श्याम रजक, उदय नारायण चौधरी आणि डाव्या पक्षांचे धीरेंद्र झा, राम नरेश पांडे यांनी राजद कार्यालयात जागावाटप जाहीर केले. पत्रकार परिषदेत राजदच्या नेत्यांनी त्यांचे मत मांडले, मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांना म्हणजे काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. एवढेच नाही तर पप्पू यादव यांच्या उमेदवारीबद्दल विचारले असता पत्रकार परिषदच आटोपती घेण्यात आली.

जन अधिकार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणारे पप्पू यादव तीन वेळा येथून खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते या जागेसाठी इच्छुक होते. यासाठी त्यांनी गेल्या आठवडय़ात काँग्रेस प्रवेशापूर्वी लालू प्रसाद यांची भेटही घेतली होती. राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पप्पू यादव यांना या जागेसाठी भेटले होते. मात्र पप्पू यादव यांनी माधेपुरा किंवा सुपौल येथून निवडणूक लढवावी, असे लालूप्रसाद यांनी सुचवले.

माधेपुरातून पप्पू यादव 2014 मध्ये राजदच्या तिकिटावर निवडून आले होते. सुपौलमधून त्यांच्या पत्नी रंजन या निवडून आल्या होत्या. आता या दोन्ही जागाही राजदनेच घेतल्या आहेत. महाआघाडीचा धर्म म्हणून जागावाटपात पूर्णियाची जागा राजदला गेली असली तरी अपक्ष म्हणून लढण्याचे संकेत पप्पू यांनी दिले आहेत.