मोदी सरकारच्या जाहिरातबाजीसाठी रेल्वेच्या डोक्यात सेल्फी पॉइंटचे भूत!

मोदी सरकारच्या वेगवेगळय़ा योजनांची जाहिरात करण्यासाठी देशातील तब्बल 800 स्थानकांवर सेल्फी पॉइंट उभारले जाणार आहेत. एका बाजूला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्थानकात बसवलेले मेटल डिटेक्टर, बॅगेज स्पॅनर मशीन बंद पडलेले असतानाच दुसऱया बाजूला मात्र सेल्फी पॉइंट उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उदासीन असलेली रेल्वे सेल्फी पॉइंटबाबत एवढी सतर्क का, असा सवाल उपस्थित होत आहे.

रेल्वे बोर्डाने ऑक्टोबर महिन्यात प्रत्येक विभागीय रेल्वेला 20 सेल्फी पॉइंट बनवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार छत्रपाती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासह अनेक ठिकाणी मोदी सरकारची उज्ज्वला योजना, स्कील इंडिया, रोजगार मेळा, चांद्रयान मोहिम अशी थीम घेऊन सेल्फी पॉइंट उभारले आहेत. त्यावर प्रत्येकी सहा लाख रुपयांपर्यंत खर्च केला आहे.

अधिकाऱ्यांची खरडपट्टी

पहिल्या टप्प्यात 20 सेल्फी पॉइंट उभारणे आवश्यक होते. ते उभारण्यास विलंब लागल्याने रेल्वे बोर्डाने संबंधित विभागातील अधिकाऱयांची नुकतीच खरडपट्टी काढली आहे. त्यामुळे सर्वच विभागीय रेल्वे प्रशासनाने सेल्फी पॉइंटच्या उभारणीला प्राधान्य दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टु डी, थ्री डी सेल्फी पॉइंट

प्रवाशांना सेल्फी पॉइंटकडे आकर्षित करण्यासाठी रेल्वेकडून टु डी, थ्री डी सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छबीसह वेगवेगळय़ा योजनांच्या प्रतिकृती असणार आहेत. टु डी सेल्फी पॉइंटसाठी सुमारे सव्वा लाख तर थ्री डीसाठी सहा लाख रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे रेल्वेचा कोटय़वधी रुपयांचा चुराडा होणार असल्याचे दिसत आहे.