सोलापूरमध्ये काँग्रेसचे वजन वाढले, नरसय्या आडम यांचा प्रणिती शिंदे यांना पाठिंबा

सोलापूरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा लोकसभेचा सामना आता टप्प्याटप्प्याने अधिक रोमांचक होऊ लागला आहे. माकपचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांनी त्यांच्या कट्टर विरोधक असलेल्या प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसचे वजन तर वाढले आहेच, पण बहुरंगी, बहुभाषिक सोलापूरची प्रचार आणि निकालाची रंगतही अधिक वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कामगार नेते नरसय्या आडम काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी नरसय्या आडम यांची माकप कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीतच नरसय्या आडम यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन देत कामगार आपल्या मागे राहतील, असा शब्द दिला.

आडम मास्तर सोलापूर शहरातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. 1978, 1995, 2004च्या निवडणुकीत नरसय्या आडम यांनी विजय मिळवलेला होता. कामगारांचा नेता अशी ओळख असलेला नरसय्या आडम मास्तर यांचा 2009च्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी पराभव केला. त्यानंतर झालेल्या 2014 आणि 19च्या निवडणुकीतदेखील प्रणिती शिंदे यांनी नरसय्या आडम यांचा पराभव केला. त्यामुळे प्रणिती शिंदे आणि नरसय्या आडम हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात.

वंचित, एमआयएमच्या मतांची वजाबाकी भरून निघणार

सोलापूर लोकसभेसाठी आता वंचित आणि एमआयएमनेही आमचे उमेदवार रिंगणात उतरवले असल्यामुळे हे दोन पक्ष प्रणिती शिंदे यांना मिळणारी किती मते पळवतील, याचा अंदाज बांधला जात होता. मात्र असे असताना नरसय्या आडम यांच्या एन्ट्रीने प्रणिती यांचे पारडे पुन्हा जड झाले आहे. सोलापूरमध्ये अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या माकपने दिलेला पाठिंबा म्हणजे अर्धे मैदान मारल्यासारखे आहे. त्याचबरोबर वंचित आणि एमआयएमच्या मतांची वजाबाकीही सहज भरून निघणार आहे, असे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले.