कमी गुण देऊन विद्यार्थ्यांना केले अपात्र, पुणे विद्यापीठाकडून सेट परीक्षा पेपर तपासणीत घोळ

exam_prep
प्रातिनिधिक फोटो

सेट परीक्षा पास होऊन प्राध्यापक बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुण उमेदवारांना पुणे विद्यापीठाच्या पेपर तपासणीत मोठा फटका बसला आहे. 27 जूनला सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत मुंबईतील काही विद्यार्थ्यांना कमी गुण देऊन अपात्र केल्याचे उघडकीस आले आहे.

पुणे विद्यापीठाकडून 26 मार्च रोजी घेण्यात आलेली सेट परीक्षा राज्यभरातील विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने दिली. या परीक्षेचा निकाल 27 जून रोजी जाहीर करण्यात आला. एमसीक्यू पद्धतीने घेतलेल्या या परीक्षेची आन्सर की विद्यापीठाकडून निकालाच्या दिवशीच जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी आणि आन्सर की तपासली असता काही विद्यार्थ्यांना त्यांचे गुण वाढत असल्याचे लक्षात आले.

मॅथेमॅटिक्स सायन्स हा विषय घेऊन सेट परीक्षा दिलेल्या मुंबईतील एका विद्यार्थिनीने दै. ‘सामना’शी बोलताना आपले परीक्षेत तब्बल आठ गुण वाढत असल्याचे सांगितले. अजूनही काही विद्यार्थ्यांच्या गुणात वाढ होत असून यांपैकी काही विद्यार्थ्यांनी निकालानंतर लगेचच पुणे विद्यापीठाशी मेल आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यापीठाकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

सेट परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना 5 जुलैला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याआधी विद्यापीठाने अपात्र उमेदवारांच्या निकालाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. सेट परीक्षेसाठी पुनर्तपासणीचा पर्याय नसल्याने परीक्षार्थींवर अन्याय होत आहे.