अल्पवयीन मुलीवर टॅक्सीत लैंगिक अत्याचार; टॅक्सीचालक, लॉज मालकाला अटक

मुंबईत महिला व बालिकांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे . एका 14 वर्षीय मुलीवर टॅक्सीमध्येच  चालक व लॉज मालकाने लैंगिक अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे.  पोलिसांनी दोघांनाही बेडय़ा ठोकल्या असल्या तरी या घटनेमुळे महिला सुरक्षेवर  प्रश्नचिन्ह उभे रहिले आहे.

दक्षिण मुंबईत राहणारी  मुक्ता (बदललेले नाव) ही 14 वर्षांची पीडित मुलगी आहे. मानसिक संतुलन ढासळलेल्या मुक्ताला एका नातेवाईकाडे जायचे होते. त्याच तंद्रीत ती पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास एकटीच घराबाहेर आली आणि रस्त्यावर येऊन टॅक्सी पकडली. पश्चिम उपनगरात जायचे असल्याचे मुलीने सांगताच चालकाने तिला टॅक्सीत बसवले. पहाटेची वेळ आणि मुलगी एकटीच असल्याचे पाहून चालकाची नियत फिरली. त्याने लगेच दादर येथे लॉज चालविणाऱ्या मित्र सलमानला फोन केला आणि मुलीबद्दल सांगितले.  मग दादर येथे सलमान त्यांना भेटला. त्यानंतर चालक श्रीप्रकाशने टॅक्सी वांद्रय़ाच्या दिशेने पळवली. मुलीच्या असह्यायतेचा फायदा उचलत सलमानने मुक्तावर टॅक्सीतच लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर वाकोल्यात तिला सोडून दोघांनी पळ काढला. दोघे तिला सोडून सटकले, पण सुदैवाने मुक्ता वाकोला पोलिसांच्या हाती लागली. त्याचवेळी मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे तिच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली होती.

सीसीटीव्ही तपासले

वाकोला पोलिसांनी संबंधित पोलिसांना मुक्ताबद्दल कळवले. मग पोलिसांनी मुक्ताला विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर तिने घडला प्रकार सांगितला. पोलिसांनी तत्काळ गंभीर दखल घेत  वाकोलापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले.  टॅक्सीचा नंबर मिळाल्यानंतर चालक आणि त्याचा मित्र हाती लागला.