मी मारल्यासारखं करतो…सुनेत्रा पवार यांच्या क्लीन चिटला ईडीचा विरोध

25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळय़ात उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देताच सत्ताधारी मिंधेंवर टीकेची झोड उठली. याचदरम्यान ईडीने या प्रकरणात उडी घेतली आहे.  ‘मी मारल्यासारखं करतो…’ अशा भूमिकेत ईडीने सुनेत्रा पवार यांच्या क्लीन चिटला विरोध केला आहे. तसा हस्तक्षेप अर्ज ईडीने विशेष न्यायालयात केला आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पवार दाम्पत्याला कोटय़वधी रुपयांच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळय़ात क्लीन चिट दिली आहे. ईओडब्ल्यूने विशेष सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात  खळबळ उडाली. याचदरम्यान ईडीने ईओडब्ल्यूच्या क्लोजर रिपोर्टला विरोध करीत न्यायालयात हस्तक्षेप अर्ज केला आहे. सुनेत्रा पवार यांच्यासंबंधी क्लोजर रिपोर्टचा स्वीकार करण्याआधी न्यायालयाने आमचा आक्षेप विचारात घ्यावा, अशी विनंती ईडीने आपल्या हस्तक्षेप अर्जातून केल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजते. ईओडब्ल्यू ही राज्य सरकारची, तर ईडी ही केंद्र सरकारची तपास यंत्रणा आहे. एका यंत्रणेने पवार दाम्पत्याच्या सुटकेसाठी पुढाकार घेतला असताना दुसऱ्या यंत्रणेने विरोधी भूमिका मांडली. दरम्यान,  या प्रकरणात आता विशेष सत्र न्यायालय काय भूमिका घेतेय, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.