शिरीष कणेकर अनंतात विलीन 

ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शिवाजी महाराज पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कणेकर यांच्या चाहत्यांनी आणि मित्रपरिवाराने त्यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.   

शिरीष कणेकर यांचे 25 जुलै रोजी हृदयविकाराने निधन झाले.  त्यांचा मुलगा व मुलगी अमेरिकेतून आल्यानंतर कणेकरांच्या  पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता. त्यानुसार आज शिवाजी महाराज पार्क येथील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार झाले. तत्पूर्वी, कणेकर यांचे पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आले. त्यानंतर शिवाजी महाराज पार्क स्मशानभूमीत अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेतेखासदार संजय राऊत यांनी कणेकरांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली तसेच कणेकरांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. अभिनेते संजय मोने, विनय येडेकर, राजन भिसे, अजित भुरे, गायक त्यागराज खाडिलकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, चित्रपट संग्राहक डॉ. प्रकाश जोशी आदी मान्यवरांनी  कणेकरांचे अंत्यदर्शन घेतले. 

अन् कट्टा रिकामा झाला 

यावेळी कलाकारांनी कणेकरांच्या आणि शिवाजी महाराज पार्क कट्टय़ावरील आठवणी जागवल्या. अभिनेते संजय मोने म्हणाले, कट्टय़ावर आम्ही 15-16 जण असायचो. कालांतराने त्यातील  एकेक जण हे जग सोडून गेले. आता कणेकर गेले. खऱया अर्थाने आमचा कट्टा रिकामा झाला. फक्त आठवणी उरल्या. अभिनेते अतुल परचुरे म्हणाले,  कट्टय़ावर जमणाऱया सदस्यांमध्ये कणेकर वयाने मोठे होते. तरी त्यांनी ते कधी जाणवू दिले नाही. आमच्या कट्टय़ाचा ते मध्यबिंदू होते. त्यांच्या जाण्याने आमची वैयक्तिक हानी झाली आहे.