स्वत:च्या घरात काय चाललंय ते बघा, संजय राऊत यांचा अमित शहा यांना टोला

‘इंडिया’ आघाडीला डिवचणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. अमित शहा यांना इंडिया आघाडीची काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे लक्ष द्यावे. तिथे भाजपचा पराभव आणि इंडिया आघाडी विजय होताना दिसत आहे. त्यामुळे अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडिया आघाडीची चिंता करायची गरज नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

‘दै. सामना’मध्ये सोमवारी छापुन आलेल्या ‘कुमारांची चिंता! काँग्रेसचे खरेच चुकले?‘, या अग्रलेखाबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, काही लोकांना इंडिया आघाडीची फार चिंता वाटते. इंडिया आघाडीचे काय होणार, कसे होणार… इंडिया आघाडीचे सर्व काही सुरळीत सुरू असून याची चिंता गृहमंत्री अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्याची गरज नाही. नितीश कुमार इंडिया आघाडीचे प्रमुख स्तंभ असून ओमर अब्दुल्ला यांचेही आघाडीत महत्त्वाचे स्थान आहे. उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव हे एकमेकांच्या संपर्कात आहेत. इंडिया आघाडीने काय करावे, काय करू नये हे आघाडीचे नेते ठरवतील.

इंडिया आघाडी काय आहे? 2024मध्ये भाजपच्या हुकुमशाहीचा, एकाधीकारशाही, भ्रष्ट सरकारचा आणि जनताविरोधी सरकारचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली आहे. काँग्रेसला इंडिया आघाडीत नाही तर निवडणुकीत रस असल्याचे नितीश कुमार म्हणाले. ज्या राज्यांमध्ये निवडणुका लागल्या आहेत तिथे काँग्रेस नंबर वन पक्ष आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा, मिझोराम प्रत्येक ठिकाणी भाजपा हरण्याच्या स्थितीत आहे, असा दावा राऊत यांनी केला.

विधानसभेमध्ये भाजपचा पराभव केला नाही तर लोकसभेची तयारी कशी कराल? असा सवाल करत राऊत म्हणाले की, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर इंडिया आघाडीची पुन्हा बैठक होईल. या बैठकीत आम्ही राष्ट्रीय स्तरावरील जागावाटपाचा प्रश्न मार्गी लावणार आहोत. त्यामुळे इंडिया आघाडीची कोणालाही चिंता करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरात बघा, आमच्या घरात डोकावण्याची गरज नाही. 2024मध्ये इंडिया आघाडी विजय होईल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

पक्षनिधीमध्ये पारदर्शकता हवी अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. यावरही राऊत यांनी भाष्य केले. यात काहीही चुकीचे नाही. एका पक्षाच्या खात्यात 5 हजार कोटी येतात. हे पैसे कुठून आले, कोणी दिले, का दिले… पीएम केअर फंडमध्ये आलेले लाखो कोटी रुपये कुठून आले, त्याचे काय झाले हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे. 5 हजारांसाठी विरोधकांची घरं पालथी घालणाऱ्या ईडीला याची माहिती हवी, हा हवाल्याचाही पैसा असू शकतो, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)