गद्दारांना गाडण्यासाठी शिवसेनेचे वाघ निघाले! तुफान गर्दी, गगनभेदी घोषणा आणि विजयाचा निर्धार

कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला…, शिवसेना झिंदाबाद…, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, अशा गगनभेदी घोषणांनी आज मुंबईचा फोर्ट परिसर आणि ठाणे शहर दणाणून गेले. लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबईतून शिवसेना पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई आणि ठाण्यातून राजन विचारे यांनी आपले उमेदवारी अर्ज तुफान गर्दी, ढोलताशांचा गजर आणि गगनभेदी घोषणांच्या निनादात दाखल केले. शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या वेळी उपस्थित होते. अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याला निष्ठsचे पुष्पार्पण करीत नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला. तर राजन विचारे यांनी ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर जाऊन अभिवादन केले. निष्ठावंत शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत निघालेल्या या रॅलीतून मुंबईपासून ठाण्यापर्यंत गद्दारांना गाडणारच हा निर्धार घुमला.

शिवसेना नेते अरविंद सावंत, सचिव अनिल देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस, पर्ह्ट येथे उमेदवारी अर्ज सादर केले. फोर्ट येथील रिगल सिनेमाजवळील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करून या मिरवणुकीची सुरुवात झाली. या वेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. या वेळी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी, ‘आप’, ‘शेकाप’सह महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या हातात पक्षाचे झेंडे झळकत होते. सुमारे तासभर चाललेल्या मिरवणुकीत जागोजागी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांचे जंगी स्वागत होत होते. या निवडणुकीत गद्दारांना गाडणार आणि शिवसेनेचे उमेदवार विक्रमी मताधिक्याने निवडून आणणार, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत होता.

या वेळी शिवसेना गटनेते अजय चौधरी, आमदार प्रकाश फातर्पेकर, नितीन देशमुख, उपनेते सचिन अहिर, मिलिंद वैद्य, राजकुमार बाफना, मनोज जामसुतकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, भाई जगताप, अमिन पटेल, कपिल पाटील, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह रवींद्र मिर्लेकर, सुधीर साळवी, किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, महेश सावंत, संतोष शिंदे, प्रमोद शिंदे, श्रद्धा जाधव, निरंजन नलावडे, हरीश वरळीकर, राम साळगावकर, गजा चव्हाण, बबन गावकर, सुबोध आचार्य, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सुप्रदा फातर्पेकर, पद्मावती शिंदे, भालचंद्र मुणगेकर, काँग्रेसचे चंद्रकात हांडोरे, रवी राजा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष हुकूमराज मेहता, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, काँग्रेसचे गणेश यादव, राजन भोसले, शेकापचे राजू कोरडे, दीपक निकाळजे, सागर संसारे, मिलिंद रानडे, ‘आप’च्या प्रीती मेनन, सपाचे आरीफ शेख यांच्यासह शिवसेना आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीची प्रचंड एकजूट

मुंबई आणि ठाण्यात महाविकास आघाडीची प्रचंड एकजूट आज पाहायला मिळाली. जणू महाविकास आघाडीचे तुफानच रस्त्यांवर आले होते. शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य घटकपक्षांचे शेकडो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. भगव्यासह तिन्ही पक्षांचे झेंडे रॅलीत डौलाने फडकत होते. फोर्टमधील रिगल सिनेमा ते ओल्ड कस्टम हाऊसपर्यंतचा रस्ता गर्दीने ओसंडून वाहत होता.

मशालीचे तेज, भगव्याचा उत्साह

उमेदवारी अर्ज सादर करताना काढण्यात आलेल्या प्रचंड मिरवणुकीत शेकडो शिवसैनिक महिला भगव्या टोप्या, भगव्या साडय़ा परिधान करून सहभागी झाल्या होत्या. हातातीत तळपती मशाल उंचावून शिवसेनाच जिंकणार, असा ठाम विश्वास महिला भगिनींकडून व्यक्त करण्यात येत होता. तर अनेक शिवसैनिकही भगवे सदरे, भगव्या टोप्या आणि भगवी उपरणी घालून सहभागी झाले होते.

ठाणेकरांचा एकच निर्धार…

गद्दारांना गाडणार… राजन विचारेच जिंकणार… हा निर्धार करून हजारो ठाणेकर रखरखत्या उन्हाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले होते. शक्तीस्थळ येथे ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या स्मृतींना राजन विचारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी वंदन केल्यानंतर सकाळी दहा वाजता रॅलीला प्रारंभ झाला. ढोलताशांचा गजर आणि गगनभेदी घोषणा देत या रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केले. रॅलीतील रथावर जागोजागी ठाणेकरांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केले.