मोदीभक्तांनो, तुम्ही देशभक्त नाही काय? भाजपच्या टोळधाडीला उद्धव ठाकरे यांचा सवाल

मराठवाडय़ात पुन्हा एकदा जनसंवादाचे भगवे तुफान घेऊन आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मोदीभक्तांची जबरदस्त सालटी काढली. मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत भाषणाची सुरुवात माझ्या देशभक्त बांधवांनो… अशी केल्यामुळे मी हिंदुत्व सोडले अशी बांग भाजपच्या पिलावळीने ठोकली आहे. मात्र मोदीभक्तांना माझा सवाल आहे, देशभक्ती या शब्दाचे तुम्हाला वावडे आहे काय? तुम्ही देशभक्त नाही काय, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदीभक्तांवर कडाडून हल्ला चढवला. हे हिंदुत्ववादी आहेत, देशासाठी काहीतरी करतील असे आम्हाला वाटले होते; पण शासकीय यंत्रणांना राजरोस हाताशी धरून खंडण्या वसूल करणारी टोळी म्हणजे भाजप, असा भीमटोलाच उद्धव ठाकरे यांनी लगावला.

हिंगोली जिल्हय़ात आज जनसंवादाचे भगवे तुफान आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसमत, सेनगाव तसेच कळमनुरी येथे जनसामान्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, परभणीचे खासदार संजय जाधव, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, संतोष टारफे, सहसंपर्कप्रमुख विनायक भिसे, डॉ. रमेश शिंदे, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, अजय उर्फ गोपू पाटील, आदींची उपस्थिती होती.

मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत भाषणाची सुरुवात माझ्या देशभक्त बांधवांनो… अशी केल्यामुळे भाजपचे खुळखुळे वाजायला सुरुवात झाली. मी हिंदुत्व सोडले अशी काव काव भाजपवाले करत आहेत. त्याचा समाचार घेत उद्धव ठाकरे कडाडले, मोदीभक्तांना देशभक्ती या शब्दाचे वावडे आहे काय? मोदीभक्त देशभक्त नाहीत काय? भाजप हिंदुत्ववादी आहे असा आपला समज होता. त्याच समजातून अनेक वर्षे आम्ही सोबत होतो. परंतु ही तर शासकीय यंत्रणांना हाताशी धरून खंडण्या वसूल करणारी टोळी आहे! हा कसला आलाय पक्ष? काही नीतिमत्ता, काही विचार राहिलाय का यांच्यात शिल्लक? असा भीमटोलाच उद्धव ठाकरे यांनी लगावला.

अच्छे दिनाचे गाजर दाखवून भाजपने 2014 मध्ये सत्ता मिळवली. सत्ता मिळवली, पण देशासाठी यांनी काही केले नाही. सत्यपाल मलिक यांनी पुलवामाबद्दल खळबळजनक खुलासा केला. त्यावर या भाजपवाल्यांचे दाभाड बसले. देशाचे रक्षण करणाऱया जवानांना कोणतेही संरक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे या जवानांना नाहक आपला जीव गमावावा लागला. ही जबाबदारी मोदी सरकारची होती. पण सरकारने मलिकांनाच गप्प बसवले. मलिक यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी का करण्यात आली नाही? त्यावर मिठाची गुळणी धरायची आणि धर्माधर्मात भांडणे लावून आपला मतलब साधायचा एवढेच भाजपने केले, अशी कठोर टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

दाभडी गाव विसरले

2014 च्या निवडणुकीत मोदी यवतमाळच्या दाभडी येथे गेले होते. चाय पे चर्चा! विकासासाठी दाभडी हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणा केली. पण गेल्या दहा वर्षांत गावात चिमूटभरही विकास झाला नाही. या गावचे ग्रामस्थ यवतमाळच्या सभेत मोदींना भेटायला गेले होते. परंतु त्यांना भेटू दिले नाही. हे ग्रामस्थ दिल्लीतही गेले. पण तेथेही भेट नाकारली. भेटच मागत होते ना, दुसरे काय मागत होते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

रोख्यांचे बिंग न्यायालयानेच फोडले

सर्वोच्च न्यायालयानेच भाजपचे निवडणूक रोख्यांचे बिंग फोडले. या रोख्यांच्या माध्यमातून भाजपने घसघशीत आठ ते दहा हजार कोटी रुपयांची कमाई केली. अनेक कंपन्यांना कारवाईचा धाकदपटशा दाखवून त्यांच्याकडून रोख्यांच्या माध्यमातून वसूली करण्यात आली. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात, सरकारने या कंपन्यांवर मेहेरबानी केली असेल म्हणूनच त्यांनी पक्षाला पैसे दिले असतील. पोट फुटेस्तोवर स्वतः खायचे आणि कारवाया मात्र विरोधकांवर करायच्या हे यांचे धंदे! असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला.

खोटारडेपणाचा पर्दाफाश करा

हिंगोलीचा पालकमंत्री महिलेबद्दल अपशब्द काढतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून बसता, हेच तुमचे हिंदुत्व! आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता. दहा वर्षांत भाजपने लोकांना खोटी आश्वासने देण्यापलीकडे काही केले नाही. या खोटारडेपणाचा पर्दाफाश आता करण्याची वेळ आली आहे. जनतेच्या न्यायालयात यांचा फैसला होणारच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ना खाऊंगा म्हणतात पण खातायत तर भरपूर!

शंभर-दीडशे कोटींचा नफा असणाऱया कंपन्यांनीही काही हजार कोटींचे रोखे दिलेत. काहींना रोखे दिल्यानंतर कामे मिळालीत तर काहींनी कामे मिळाल्यानंतर रोखे दिलेत. महाराष्ट्रातील आपलं सरकार पाडल्यानंतर मेघा नावाच्या कंपनीला दिलेल्या कामांची यादी वाचली तर डोळे पांढरे होतील. हा भ्रष्टाचार नाही का? भ्रष्टाचार करून मोदी खातायत तर भरपूर मग कोणत्या तोंडाने सांगतात, ना खाऊंगा, ना खाने दूंगा, असा बोचरा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

आज उमरखेडमध्ये जनसंवाद मेळावा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नांदेड आणि हिंगोली जिल्हय़ांच्या दौऱयावर असून, त्यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी 11.30 वाजता उमरखेड येथे जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांची उपस्थिती राहणार आहे.

गद्दारांचे डिपॉझिट लोक जप्त करतील

संतांची भूमी असलेल्या या हिंगोलीत खासदार आणि आमदाराने गद्दारी केली. काय दिले नाही त्यांना? पण गेले. गद्दार गेले, पण निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. जिल्हय़ातील हळद संशोधन प्रकल्पाला मुख्यमंत्री असताना मी मंजुरी दिली. आता हे टिनपाट सांगतात, माझ्यामुळेच प्रकल्प आला म्हणून. या मैदानात, बघा… लोक हळद लावतात का तुम्हाला! गद्दारांनी उभेच राहावे, लोक त्यांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाहीत, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

इतिहास निष्ठावंतांचा लिहितात

इतिहास हा निष्ठावंतांचा लिहिला जातो; गद्दारांचा नाही, असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. गद्दारांनी पाठीत खंजीर खुपसून पळ काढला. अशा पळपुटय़ांना पुन्हा संधी द्यायची नाही. गद्दारीला याच मातीत मूठमाती द्यायची आहे. तो पोलीस कमिशनरचा फौजदार होऊन आला आणि फुशारकी मारतोय, मी परत आलो म्हणून. 2024 मध्ये सत्ता आमच्या हाती आल्यानंतर फडणवीस, तुमचा पक्ष जागेवर राहील का, असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी केला. बेरोजगारी वाढलीय, शेतकरी आत्महत्या वाढल्यात, पण हे अनाजीपंत मात्र फोडाफोडीत मशगूल असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला.

देशभरात उद्धव ठाकरेंना गौरविले

कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या मोठी होती. मात्र,मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे मृत्युदर कमी होता. त्यांच्या कामामुळे देशभरात प्रथम क्रमांक एकचा मुख्यमंत्री म्हणून त्यांना गौरविण्यात आले, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. सत्तेत आल्यानंतर पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. शेतकऱयांच्या पिकाला भाव मिळत नाही हे सरकार केवळ टक्केवारीचे सरकार आहे. मागील काही दिवसापूर्वी  गोलीचे पालकमंत्री व गद्दार खासदार यांच्यामध्ये टक्केवारीवरून एकमेकांना शिवीगाळ झाली, असे त्यांनी सांगितले.