दिल्लीश्वर पातशहा सारखी शब्द फिरवायची सवय तुम्हालाही लागली, अंबादास दानवे यांची फडणवीसांवर टीका

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवाचा समारोप 17 सप्टेंबर रोजी होत आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असून यांच्या तब्बल 75 मिनिटांच्या दौर्‍यावर कोट्यवधी रुपये उधळण्यात येत आहेत. दरम्यान या सोहळ्याआधी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठवाड्यासाठी केलेल्या घोषणांची आठवण करून दिली आहे. या घोषणांपैकी सर्वच अपूर्ण असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.

”मराठवाड्यासाठी 2016 साली शेवटची कॅबिनेट बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने संभाजीनगरला घेतली होती. आजही ते ‘सुपर सीएम’ च्या भूमिकेत या खोके सरकारमध्ये आहेत. त्यावेळी त्यांनी 49020 कोटींची घोषणा केवळ मराठवाड्यासाठी केली होती. त्यावेळी झालेल्या घोषणांपैकी जवळपास सगळ्याच अपूर्ण आहेत.” असे सांगत अंबादास दानवे यांनी त्यावेळी फडणवीसांनी केलेल्या घोषणांचे काय झाले असा सवाल केला आहे. ट्विटरवरून राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी काही घोषणांची यादीच जाहीर केली.

”1. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संभाजीनगरातील घोषित स्मारकाचे काम किती वर्षे चालणार? 2. धाराशिवच्या तेर येथे वस्तुसंग्राहलयसाठी घोषित आठ कोटींचे काम अजूनही सुरूच आहे. भीक देत आहात का? 3. सुमारे 450 कोटींच्या म्हैसमाळ विकास आराखड्याचे काय झाले? आज तिथे जाण्यासाठी नीट वाटही उरलेली नाही. 4. नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या विकासासाठी घोषित सुमारे 250 कोटी कुठे आहेत? भंपक वागण्यातून देव देवतांना तरी सोडा? 5. लातूरला विभागीय क्रीडा संकुल दिले होते. ते आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बांधणार आहात का? 6. मराठवाड्यात डेअरी विकास बोर्डाच्या माध्यमातून 1000 गावात दूध योजना आणून 1.25 लाख लोकांना रोजगार देणार होतात. योजना नक्की मराठवाड्यासाठीच होती की विदर्भासाठी? 7. संभाजीनगरातील करोडीला ट्रान्सपोर्ट हब बनवणार होतात. अजून जमीन सापडली नाही का? 8. परभणी येथे 68 एकरावर टेक्स्टाईल पार्क उभारणार होतात? तुमच्या अधिकाऱ्यांनी साधी जागा तरी पाहिली आहे का या प्रकल्पासाठी? 9. मराठवाड्याची वॉटर ग्रीड योजना कुठे बारगळली? आज मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या काळ्या छायेत गेला आहे. 10. कृष्ण-मराठवाडा सिंचन योजनेसाठी 4800 कोटी देणार होतात. किती कवड्या दिल्या, काम किती झाले? 11. ‘इतर’ सिंचन प्रकल्पांसाठी 1048 कोटी देणार होतात? हे ‘इतर’ कोणते आणि त्याला किती निधी दिला? 12. नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी 2826 कोटींची कबुली होती. किती निधी दिलात, कारण प्रकल्प अजूनही अपूर्णच आहे. 13 . विमानतळ विस्तारीकरणासाठी 200 कोटींची घोषणा केलीत. विस्तार होत राहील, विमानांची नवीन शहरांशी जोडणी संभाजीनगरला मिळावी यासाठी साधे पत्र तरी लिहिले का? 14. संभाजीनगर पॉलिटेक्निकला अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर करण्यासाठी एक कोटी. सध्याचा गव्हर्नमेंट इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने अनेक विभाग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, अजून एक कॉलेज देऊन तिथे काय पाहायचे? नुसत्या भिंती? 15. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाच्या संस्थेला 279 कोटी देणार होतात. प्रत्यक्षात मंजूर केले फक्त 12 कोटी. किमान तुमच्याच पक्षाचे गोपीनाथ मुंडे यांचे तरी व्हा? 16. ग्रामीण भागात 1.21 लाख घरे (180 कोटी खर्चून) बांधणार होतात. किती लोकांना छप्पर मिळाले, जरा सांगता का? 17. 25 हजार हेक्टरवर फळबागा उभारण्यासाठी ३७५ कोटींची कबुली होती. आज ती झाडे मोठी झाली असतील ना? जरा सांगता का, ही बाग नेमकी कुठे आहे? 18.जालन्यात सीड पार्क साठी 109 कोटींचा वायदा होता. तुमच्या या घोषणेची वाट पाहून आज सीड कंपन्यांची मुख्यालये हैद्राबादला स्थलांतरित होत आहेत.”, असे 18 प्रश्न ट्विटरवरून अंबादास दानवे यांनी उपस्थित केले आहेत.

”यंदा नव्या घोषणांच्या पूर्वी जुन्या यादीचे काय झाले हे पण आपण सांगाल, अशी अपेक्षा मराठवाड्याच्या जनतेला आहे. यंदा संभाजीनगरात येत असताना घोषणा जरा जपूनच करा. कारण आपल्या खोकेबाजीची, धोकेबाजीची नोंद तब्बल 32 देश घेत असतात, असं म्हणतात. तुमच्या दिल्लीश्वर ‘पातशहा’ सवय आहे शब्द फिरवायची/विसरायची. तीच तुम्हालाही लागली आहे”, असा टोलाही दानवे यांनी फडणवीसांना लगावला आहे.