केडगांव-नेप्ती रोडसाठी साखळी उपोषण करणार, शिवसेनेचा इशारा

केडगांव एकनाथनगर – नेप्ती रोडचे काम तातडीने चालू करावे, अन्यथा साखळी उपोषण करण्यात येईल, या मागणीचे निवेदन केडगांव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने विभागप्रमुख संग्राम कोतकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता बाविस्कर यांना देण्यात आले. यावेळी युवासेना शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, केडगांव-नेप्ती रोड लगत अनेक मोठी उपनगरे तयारे झालेली आहेत. तेथील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी नेप्ती रोड हा एकमेव मार्ग आहे. तसेच नेप्ती कांदा मार्केट या मार्गावरच असल्याने मोठ-मोठी अवजड वाहनांची वाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे या रस्त्यावर अनेक छोट-मोठे खड्डे झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांचे अपघात होतात. काहींना अपंगत्व व मणक्याचे आजार जडले आहेत. याबाबत वेळोवेळी निवेदने, उपोषण, आंदोलने केली परंतु अद्यापही काम झालेले नाही. 27 जुलै रोजी रस्तारोका केला, त्यावेळी आपल्या कार्यालयाकडून लेखी आश्वासन दिले त्यात 2 ऑगस्ट पासून काम सुरु करण्याचे पत्र दिले होते, परंतु अद्यापही सुरु झाले नाही म्हणून 14 ऑगस्ट रोजी दालनात नागरिकांसह ठिय्या आंदोलन केले त्यावेळीही आपल्या विभागाने 20 ऑगस्ट रोजी काम चालू करण्याचे लेखी पत्र दिले, परंतु अद्यापही नेप्ती रोडचे काम सुरु झालेले नाही.

तरी या रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे, अन्यथा याच रस्त्यावर त्रस्त नागरिकांसह साखळी आमरण उपोषण करु, याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.