हिंदूहृदयसम्राटांचा अपमान केल्याबद्दल एकनाथ शिंदेवर गुन्हा दाखल व्हायला हवा, संजय राऊत यांचे संतप्त उद्गार

मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते दत्ता दळवी यांना बुधवारी सकाळी भांडूप पोलिसांनी अटक केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याप्रकरणी त्यांना ही अटक करण्यात आली आहे. शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा दळवींवर आरोप करण्यात आला आहे. दळवींच्या अटकेची बातमी कळताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी तत्काळ भांडूप पोलीस स्टेशनला धाव घेतली. आम्ही सगळे दत्ता दळवींच्या पाठीशी आहोत आणि आम्ही त्यांनी केलेल्या विधानाचे समर्थन करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. ‘गद्दार हृदयसम्राटांनी स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणवून घेणे हे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे आणि यासाठी एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा.’ असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.

‘आनंद दिघे असते तर या गद्दार हृदयसम्राटांना चाबकाने फोडून काढले असते’ असे विधान दत्ता दळवी यांनी केले होते. दळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक शब्द वापरला होता, ज्यासाठी त्यांना ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या शब्दासाठी दळवी यांना अटक करण्यात आली तो शब्द ‘धर्मवीर’ या चित्रपटात आनंद दिघे यांच्या तोंडी घातला आहे. मग हा शब्द सेन्सॉरने का काढला नाही? जर हा शब्द आक्षेपार्ह असेल तर चित्रपटाचे निर्माते, प्रायोजक, कलाकार यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल केला का ? तोच शब्द दळवींनी गद्दार हृदयसम्राटांबाबत वापरला असेल तर त्यांना अटक कशी केली जाते ? असे सवाल राऊत यांनी विचारले आहेत. भाजपचे आणि गद्दार हृदयसम्राटाच्या गटाचे शिव्या घालतात मात्र त्यांना कधी अटक होत नाही असे राऊत पुढे म्हणाले.

राऊत यांनी यावेळी बोलताना म्हटले की “राणेंनी गाढव नाक्यावर माझ्याविरोधात भाषण केले, शिव्या दिल्या गुन्हा दाखल केलात का ? अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंविरोधात अत्यंत घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली, गुन्हा दाखल केला का ? भाजपचे आणि गद्दार हृदयसम्राटाच्या गटाचे शिव्या घालत आहेत, मात्र त्यांना अटक केली जात नाही.” राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी पार कोलमडला आहे. त्याला मदत करण्याऐवजी त्याला वाऱ्यावर सोडून गद्दार मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री हे प्रचारासाठी फिरत आहेत. यावरून त्यांच्यावर टीका होत असून या टीकेपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली असल्याचे राऊत यांनी म्हटले.