मिंध्यांना शिवसेनेची ‘अॅलर्जी’ संजय गांधी उद्यान समितीतून रविंद्र वायकरांचे नाव वगळले

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाशी संबंधित स्थापन करण्यात आलेल्या समितीतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार रवींद्र वायकर यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे मिंधे सरकारला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अॅलर्जी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या उत्तरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जागेवरील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाच्या अडचणीच्या संदर्भात चौकशी करून उपाययोजना  करण्याबाबत विधिमंडळ सदस्यांची समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पात्र झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी राज्याच्या महसूल व वन विभागाच्या वतीने बारा लोकप्रतिनिधींची समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये आशीष शेलार, प्रवीण दरेकर, अतुल भातखळखर, प्रकाश सुर्वे, अमित साटम, सुनील प्रभू, मनीषा चौधरी, महादेव जानकर, सुनील राणे, मिहिर कोटेचा व राजहंस सिंह यांची वर्णी लागली आहे. यामध्ये सुनील प्रभू शिवसेनेचे हे एकमेव आमदार आहेत.