अफगाणिस्तानचे सुपर फोरचे लक्ष्य हुकले, ‘ब’ गटातून बांगलादेशपाठोपाठ श्रीलंका सुपर फोरमध्ये

‘ब’ गटातून सुपर फोरमध्ये मजल मारण्यासाठी अफगाणिस्तानला श्रीलंकेचे 292 धावांचे लक्ष्य 37.1 षटकांत गाठायचे होते. या लक्ष्यासाठी अफगाणिस्तानने जोरदार प्रयत्न केले, पण त्यांचे प्रयत्न थोडक्यात चुकले. त्यांना श्रीलंकेपेक्षा सरस धावगती करण्यासाठी 37 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकाराची गरज होती, पण फझलहक फारुकीला धनंजयाने पायचीत केले आणि अवघ्या 2 धावांच्या विजयासह सुपर फोर गाठले.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना कुसल मेंडिसच्या 92 धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर 50 षटकांत 8 बाद 291 धावा केल्या. दुनिथ वेल्लालगे आणि महीश तीक्षणा यांनी नवव्या विकेटसाठी 11 षटके किल्ला लढवत केलेल्या 64 धावांच्या भागीमुळे लंकेला ही मजल मारता आली होती. त्यानंतर 292 धावांचा पाठलाग करणाऱया अफगाण संघाला 37.1 षटकांत हे लक्ष्य गाठायचे होते, पण 37 व्या षटकांत राशीद खानने वेल्लालगेला तीन चौकार ठोकत सामन्याची उत्कंठा वाढवली. त्यानंतर 38 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 3 धावांची गरज होती, पण बांगलादेशचा मुजीब बाद होतो. त्यानंतर सलग दोन चेंडू वाया गेल्याने अफगाणला लंकेपेक्षा सरस धावगती राखण्यासाठी एका चेंडूवर षटकाराची गरज होती, पण धनंजयाने फारुकीला पायचीत करत लंकेला विजय मिळवून दिला. राशीद खान दुर्दैवाने नाबाद राहिला. अफगाणिस्तानच्या विजयासाठी तब्बल सात फलंदाजांनी जोरदार खेळ केला, पण तो अपुरा ठरला.