हिंदुस्थानचा निम्मा संघ वर्ल्ड कप अनुभवी

हिंदुस्थानचा 15 सदस्यीय वर्ल्ड कप संघ जाहीर झाला असला तरी त्यापैकी 8 खेळाडू वर्ल्ड कप अनुभवी आहेत. त्यामुळे फक्त सात खेळाडूच पहिल्यांदा वर्ल्ड कप खेळतील.

हिंदुस्थानच्या संघात विराट कोहलीसारखा चौथा वर्ल्ड कप खेळणारा अनुभवी फलंदाज आहे. त्याचा अपवाद वगळता रोहित शर्मा, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी हे तिघेजण दोन-दोन वर्ल्ड कप खेळले आहेत तर के. एल. राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि हार्दिक पंडय़ा हे चौघे गेल्या वर्ल्ड कपमध्ये खेळले होते. संघात वर्ल्ड कप अनुभवी खेळाडूंचे बहुमत आहे, मात्र सात खेळाडू अल्पमतात असले तरी त्यांची निवड जोरदार आहे. सलामीवीर शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकुर हे पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणार आहेत.

हे मुकले वर्ल्ड कपला

केवळ संजू सॅमसन, प्रसिध कृष्णा किंवा तिलक वर्माच आपल्या पहिल्या वर्ल्ड कपला मुकले नाहीत तर युझवेंद्र चहल, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर अशा खेळाडूंनाही संघात स्थान मिळविता आलेले नाही. हिंदुस्थानचा निम्मा संघ अनुभवी असला तरी सात खेळाडू पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळतील. कुणाची निवड योग्य ठरली आणि कुणाची डोईजड हे लवकरच कळेल.