तुमचे रटाळ भाषण बंद करा…; भाजप बुथप्रमुखांच्या बैठकीत कार्यकर्ते आक्रमक

भाजपच्या बुथप्रमुखांच्या बैठकीत कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी वर्षाभरात दोनदा पक्ष बदलणार्‍या भास्करराव पाटील खतगावकर यांना तुमचे रटाळ भाषण बंद करा, असे सुनावले. त्यामुळे या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला होता. शनिवारी सायंकाळी भाजपचे लोकसभेचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव येथे बुथप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार राजेश पवार, मिनल पाटील खतगावकर, व भाजपचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

प्रस्तावना आणि अन्य काही नेत्यांची भाषणे झाल्यानंतर भास्करराव पाटील खतगावकर भाषणासाठी उभे राहिले. त्यांचे भाषण सुरु झाल्यावर पाचच मिनिटात काही कार्यकर्ते आक्रमक झाले. तुमचे नेहमीचेच रटाळ भाषण आम्ही कितीवेळा ऐकायचे, वर्षभरात दोनदा पक्ष बदलला, कधी या पक्षात, कधी त्या पक्षात, तुमचे भाषण बंद करा, असे कार्यकर्त्यांनी त्यांना सुनावले. त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. इतर कार्यकर्त्यांनीही त्याला पाठिंबा देत घोषणाबाजी केली. त्यानंतर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मध्यस्थी केली. कार्यकर्त्यांना समजावले. त्यानंतर खतगावकरांचे भाषण सुरु झाले. मात्र, लगेचच त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले.

गेल्या वर्षी भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजप सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर महिन्याभरापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वेगवेगळ्या पक्षात राहून दलबदलूची भूमिका घेणार्‍या खतगावकरांचा या बुथप्रमुखांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी समाचार घेतला. अगदी स्टेजसमोर जात त्यांना सुनावले. यामुळे एकच गोंधळ उडाला. या प्रकाराची सबंध जिल्ह्यात चर्चा होत असून, खतगावकरांचा वर्षभरातील वेगवेगळा प्रवेश जनतेला रुचला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या भाषणावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले होते.