अवती / भवती – बघ, तुला जमतंय का?

>>सुहास मळेकर 

तरुण वयात कोणत्याही गोष्टीकडे फार गंभीरपणे पाहिलं जात नाही. उपहास, टावाळकी हा या वयाचा स्थायीभाव असतो. माझ्याही बाबतीत असं होतं. माझ्यासकट माझे मित्रही तसेच होते. तेव्हा कोणी चांगले काहीही केले की, त्याची टिंगल करायची असा मित्रांचा आजूबाजूला गोतावळा बघून माझ्या बाबांचा पारा चढत असे. आपल्या मुलाचे हे वर्तन बघून एक दिवस बाबांनी कान पिळत विचारले, ‘‘बघ, तुला जमतेय का?’’ 

आयुष्यभर हे शब्द व कान पिळलेला तो तीन किलोचा कष्टकरी हात आठवत राहिला आणि त्याने आम्हा भावंडांना कायम जमिनीवर ठेवले. कुणी काहीही केले की, उगीच उपहासात्मक काहीतरी बरळायचे आणि आपले मानसिक समाधान करून घ्यायचे अशी ती टवाळकी असायची.  

आता मोठे झाल्यावर लक्षात येते अशा मानसिकतेची बरीच माणसे सर्रास आजूबाजूला वावरत असतात. त्या एका वयात वेळीच आवर घातला नाही तर ही सवय अंगवळणी पडते आणि ती वृत्ती बनून जाते. बाबांनी त्या वयात वेळेवर कान उपटले नसते, किंबहुना हे अंगवळणी पाडले नसते तर आपणही त्याच पंगतीत असतो हे आठवले की अंगावर शहारा येतो. त्यानंतर कोणी काही चांगले केले की, दिलखुलास दाद द्यायची अंगी बाणले.   

कुठलेच काम छोटे किंवा मोठे नसते. ज्याला जे जमते त्याने ते करावे. जे आपल्याला जमत नाही तिथे आपण नतमस्तक व्हायलाच हवे, त्याचे कौतुक करावे, त्या व्यक्तीचा आदर करायला हवा. इतके जमले नाही तर किमान काही बोलू तरी नये हे मुलांच्या अंगात भिनवावे यावर बाबांचा कटाक्ष असे आणि बाबा कायम डोळे वटारून समोर येत राहिले. आपल्या रोजच्या जगरहाटीतच काय, घरातसंसारातसुद्धा ती करतेयबघ तुला जमतेय का? किंवा तो करतोयबघ, तुला जमतेय का? असे मनाला विचारले तर बहुधा नाहीच हे उत्तर मिळते आणि आपोआप आदर वाटू लागतो. 

आता प्रतिस्पर्धीच काय बुट पॉलिशवालासुद्धा दहाबारा तास एका जागी बसून बुट पॉलिश कसा करू शकतो याचे अप्रूप वाटते, कचरेवाली सातआठ मजले वरखाली कचऱयाच्या त्या मोठाल्या डब्यासह जिना चढउतार करून विविध प्रकारची घाणीतली घाण कचरा गोळा करते. तेव्हासुद्धा तेच शब्द आठवतातबघ, तुला जमतेय का? आणि आपोआप त्या व्यक्तीबद्दल आदर वाटू लागतो. 

प्रत्येकाने स्वतःला, तसेच समोर एखाद्या टोचून बोलणाऱयाला बघ, तुला जमतेय का? हा जाब विचारायचा निश्चय केला तर खूप फरक पडेल. कंपनी, कारखाने, दुकाने, मॉल इतकेच काय अगदी घरातूनसुद्धा हे एकच वाक्य सुभाषितासारखे भिंतीवर चिकटवायला हरकत नसावी. त्यासाठी हे कृतीत आणणारा परिपूर्ण, पारंगत असण्याची आवश्यकताही नाही, पण तो नम्र नक्कीच असायला हवा. 

बघा जमतंय का?