निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीस स्थगिती देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

2023 च्या कायद्यानुसार ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू या दोन निवडणूक आयुक्तांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू या दोघांच्या नियुक्तीवर स्थगिती देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. मात्र या नियुक्तीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

नियुक्त्यांना स्थगिती देण्यास नकार देत खंडपीठ म्हणाले, ‘सामान्यत: आणि सर्वसाधारणपणे, आम्ही अंतरिम आदेशाद्वारे कायद्याला स्थगिती देत नाही’. 2023 कायद्यांतर्गत दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी पुढे ढकलली.

न्यायमूर्ती संजीव खन्ना, दीपंकर दत्ता आणि ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांना सांगितलं की, निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी एक बैठक अगोदरच रद्द करण्यात आली होती, असं निदर्शनास आणून त्यांनी स्वतंत्र अर्ज दाखल करावा.

माजी आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने निवड केली होती.

ज्ञानेश कुमार फेब्रुवारीमध्ये सहकार मंत्रालयाचे सचिव म्हणून निवृत्त झाले, तर सुखबीर सिंग संधू हे उत्तराखंड सरकारचे माजी मुख्य सचिव होते.

संधू, 1988 बॅचचे आयएएस अधिकारी, 31 जानेवारी 2024 रोजी मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले.