पक्षाने तिकीट कापले, खासदारानं कीटकनाशक घेतले; आत्महत्येतून वाचले, पण कार्डियक अरेस्टने गेले

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना तमिळनाडूतील मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम (एमडीएमके) पक्षाचे खासदार ए. गणेशमूर्ती यांचे निधन झाले आहे. पक्षाने तिकीट कापल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा कार्डियक अरेस्टने मृत्यू झाला. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

तमिळनाडूतील इरोड मतदारसंघाचे विद्यमान खासदार A. Ganeshamurthi यांनी 24 मार्च रोजी कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी सकाळी पाचच्या सुमारास कार्डियक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

24 मार्चला सकाळच्या सुमारास ए. गणेशमूर्ती यांची तब्येत बिघडली. त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांनी कीटकनाशक घेतल्याचे निष्पन्न झाले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कोयंबतूर येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांना अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

ए. गणेशमूर्ती हे तमिळनाडूतील इरोड मतदारसंघाचे विद्यमान खासदार होते. 2019मध्ये मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघमच्या तिकीटावर ते लोकसभेमध्ये निवडून गेले होते. आता ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचे निधन झाल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.