नांदेडच्या डीनविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

प्रसूतीसाठी आलेल्या महिलेसह तिच्या बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या तक्रारीवरून नांदेड येथील शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता तसेच बालरोगतज्ञांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिंधे गटाचे लावणीबाज खासदार हेमंत पाटील यांच्या चमकोगिरीविरोधात अधिष्ठातांनी केलेल्या तक्रारीनंतर धावाधाव करून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने संभ्रम व्यक्त होत आहे.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये गेल्या चार दिवसांपासून मृत्यूचे सत्र सुरू आहे. गेल्या 72 तासांत जवळपास 55 रुग्णांचा मृत्यू झाला असून औषधांचा तुटवडा, अपुरा कर्मचारीवर्ग यामुळे हे मृत्यू झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यात मिंधे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी चमकोगिरी करत अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना रुग्णालयातील शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर त्यांना जातिवाचक शिवीगाळही केली. याप्रकरणी डॉ. वाकोडे यांच्या तक्रारीवरून खासदार पाटील यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आज महिला व तिच्या बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या तक्रारीवरून अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांच्यासह बालरोगतज्ञांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण…

लोहा तालुक्यातील मुरंबी येथील अंजली मंचक वाघमारे (21) हिला 30 सप्टेंबर रोजी प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी अंजलीने मुलीस जन्म दिला. सायंकाळपर्यंत बाळ, बाळंतिण ठणठणीत होते. मात्र 2 ऑक्टोबर रोजी अंजलीची प्रकृती बिघडली.  नवजात बालिकेची प्रकृतीही नाजूक असल्याची कल्पना कुटुंबाला देण्यात आली. त्यानंतर अंजलीचे वडील कामाजी टोम्पे यांनी अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांची भेट घेऊन उपचाराची विनंती केली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शिवीगाळ करून हाकलून दिले. त्यानंतर डॉक्टरांनी अंजलीच्या मुलीस मृत घोषित केले. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी मुलीचा मृतदेह ताब्यात देण्यात आला. दुसऱ्या दिवशी 4 ऑक्टोबरला अंजलीचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी कामाजी टोम्पे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन उपचारात दिरंगाई करणारे अधिष्ठाता आणि बालरोगतज्ञांच्या विरोधात फिर्याद दिली. त्यावरून कलम 304, 34 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नांदेड शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांना अमानवीय वागणूक देणारे मिंधे गटाचे मुजोर खासदार हेमंत पाटील यांचा गुरुवारी जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी निदर्शने करून तीव्र निषेध केला. पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणीही यावेळी डॉक्टरांनी केली.

गद्दार खासदाराविरुद्ध तक्रार केली होती

मिंधे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या चमकोगिरीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली म्हणूनच अधिष्ठाता आणि बालरोगतज्ञांच्या विरोधात आकसबुद्धीने ही तक्रार दाखल करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.

मृतांचा आकडा 52 वर

नांदेड शासकीय रुग्णालयात सुरू असलेले मृत्यूचे सत्र अद्याप थांबलेले नाही. गेल्या 24 तासांत पुन्हा 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आता 55 झाला आहे. तीन दिवसांपूर्वी 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर हा आकडा वाढतच असून 72 तासानंतर तो 55 झाला आहे. मिंधे सरकारचे मंत्री, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री येऊन गेल्यानंतरही रुग्णालयात कोणतीही सुधारणा झालेली नाही.