सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घेऊ; सातारा येथील सभेत जरांगे-पाटील यांचा निर्धार!

 

 

‘मराठा आरक्षण घेणारच आणि तेही ओबीसीमधूनच. सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घेऊ,’ असा निर्धार मनोज जरांगे-पाटील यांनी आज राजधानी सातारा येथील प्रसिद्ध गांधी मैदानावरील प्रचंड सभेत बोलताना व्यक्त केला.

‘24 डिसेंबरला आरक्षण देण्याचा सरकारचा शब्द आहे. तोपर्यंत मराठय़ांची कसोटी आहे. गाफील राहिलात तर तुमच्या लेकरांच्या वाटोळ्याला तुम्हीच स्वतः जबाबदार असाल,’ अशा शब्दांत जरांगे-पाटील यांनी मराठा बांधवांना सावध राहण्याचे, तसेच प्रचंड ताकदीने एकत्र येण्याचे आवाहन केले. ‘आरक्षणासंदर्भात नेमलेल्या समितीला नोंदी शोधण्यास सांगितले होते. राज्यभर लाखो नोंदी सापडल्या आहेत. सातारा जिह्यातही 20 हजार नोंदी सापडल्या आहेत. या नोंदींचा अहवाल तयार करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचे आहे,’ असे ते म्हणाले.

व्यासपीठावर जरांगे-पाटील यांचे आगमन होताच उपस्थितांमधून ‘एक मराठा लाख मराठा’, ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा प्रचंड घोषणा निनादल्या. मराठा क्रांती मोर्चा, सातारा यांच्या वतीने यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, शरद काटकर, राजू गोडसे, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी जरांगे–पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी जेसीबीतून पुष्पवृष्टी करीत व 40 फुटांचा भव्य पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले गेले. त्यानंतर त्यांनी पोवई नाक्यावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

कराड येथे मध्यरात्री 1 वाजता सभा

कराडमध्ये शुक्रवारी रात्री 8ची सभा मध्यरात्री 1 वाजता सुरू झाली. तरीही कडाक्याच्या थंडीत हजारो लोक जरांगे-पाटील यांची पाच तास वाट पाहत होते. जरांगे-पाटील म्हणाले की, ‘आज मराठय़ांच्या लेकरांवर वेळ आली आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहा. मराठा समाज तुमचे उपकार विसरणार नाही. पण पाठीशी राहिला नाहीत, तर हाच मराठा आयुष्यभर तुम्हाला गुलाल लागू देणार नाही.’

‘त्यांना’ किंमत देण्याची गरज नाही

जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी छगन भुजबळ यांनी गावबंदीवर घेतलेल्या आक्षेपावर विचारले असता, जरांगे-पाटील यांनी भुजबळांची खिल्ली उडविली. ‘गावबंदी कुठे आहे? गावबंदी 24 डिसेंबरपर्यंत उठविली आहे. त्यांना वाचता येत नसेल. गोरगरिबांना न्याय मिळत असेल, तर मिळू द्यावा. त्यांच्या अन्नात विष कालवू नये. मराठा समाजाने त्यांना मोठे करण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत, हे त्यांनी विसरू नये. जो माणूस घटना व कायदा पायदळी तुडवतो, राजद्रोहासारखा गुन्हा करतो, त्यांना किंमत द्यायची गरज नाही,’ अशा शब्दात जरांगे-पाटील यांनी भुजबळांचा समाचार घेतला.

जातनिहाय जनगणना करून सर्वांना न्याय द्या! – खासदार उदयनराजे

सभेनंतर मनोज जरांगे-पाटील यांनी जलमंदिर पॅलेस या ठिकाणी जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. त्यावेळी उदयनराजे यांना त्यांनी लवून मुजरा केला, तेव्हा उदयनराजे यांनी त्यांना छातीशी कवटाळले. छत्रपती शिवरायांची प्रतिमा व तलवार भेट देऊन जरांगे-पाटील यांचे स्वागत केले. यावेळी जरांगे-पाटील यांच्या कानात उदयनराजे यांनी काही सांगितले. त्याकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात कधीही कुठलाही भेदभाव केला नाही. कोणालाही अंतर दिले नाही. त्यामुळे जातीपातीचे राजकारण सोडून द्या. जातनिहाय जनगणना करून सर्वांना आरक्षण द्या. सर्वांना न्याय द्या.’

शिवेंद्रसिंहराजे यांचीही घेतली भेट

जरांगे-पाटील यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांना छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट दिली.