महापालिकेतील पालकमंत्र्यांचे दालन बनलेय बिल्डर-कॉन्ट्रॅक्टरांचा अड्डा!

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पालकमंत्र्यांनी थाटलेले कार्यालय बिल्डर, कॉन्ट्रक्टर आणि भाजपच्या माजी नगरसेवकांचा अड्डा बनलाय, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज खोके सरकारवर निशाणा साधला.  

विधान भवनाच्या आवारात आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महापालिकेत प्रशासक असतानाही तिथे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचे कार्यालय थाटलेय आणि तिथे भाजपच्या माजी नगरसेवकांची सारखी वर्दळ असते असा मुद्दा माध्यमांनी उपस्थित केला. त्यावर बीएमसीचे नाव त्यांना कदाचित कॅसा बीएमसी किंवा बीएमसी मो ठेवायचे असेल, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. 

मीसुद्धा पालकमंत्री होतो, पण आम्ही कार्यालय थाटले नाही महापालिकेत. महापौर किंवा आयुक्तांच्या दालनात बैठका घ्यायचो. कारण कुठल्याही पालिकेत अशी दालनं उघडण्याची पद्धत नाही. मंत्रालय ते बीएमसी हे अंतर काही जास्त नाही. मग पालिकेत दालन कशासाठी? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. 

मणिपूरवर एसआयटी लावा

मिठी नदीच्या गाळ उपशावर एसआयटी चौकशी लावता तशी मणिपूरच्या हिंसाचारावरही लावा, असे आव्हानही यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले. देशातील हुकूमशाहीविरुद्ध आम्ही इंडिया म्हणून लढतोय असे सांगतानाच जितेगा हिंदुस्थान असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

फुलासारखे नाव असलेले मंत्री काटय़ाप्रमाणे वागताहेत

विधीमंडळात विरोधकांबरोबर भाजपच्या आमदारांचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असून फुलासारखे नाव असलेले मंत्री काटय़ाप्रमाणे वागत आहेत, असेही टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी सोडले. जनताच याला योग्य वेळी उत्तर देईल, असे ते पुढे म्हणाले.

ही हुकूमशाही मुंबईच्या फायद्याची नाही 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशी दालने उघडून हुकूमशाही करणे हे मुंबईच्या फायद्याचे नाही, असे सांगतानाच मुंबईला लुटण्यासाठी जी यंत्रणा राबतेय तिच्यासाठी हे दालन महत्त्वाचे ठरणार आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. मुंबईकर याविरोधात आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिला.