सीसीटीव्हीसाठी कमान उभारणार, मुंबई-पुणे एक्प्रेस वे आज दोन तास बंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱया मार्गिकेवर खंडाळा सबस्टेशन परिसरात सीसीटीव्हीसाठी उद्या शुक्रवारी कमान उभारण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 2 या कालावधीत या मार्गिकेवर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. हलक्या वाहनांची वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात आली असून जड आणि अवजड वाहनांना ब्लॉकच्या कालावधीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

खंडाळा बोगदा आणि बोरघाटादरम्यान बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी खंडाळा येथे सीसीटीव्ही कमान उभी करण्यात होणार आहे. किलोमीटर क्रमांक 54 च्या पुढे ही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. कमान उभारण्यासाठी मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक उद्या दुपारी 12 ते 2 या कालावधीत बोरघाटात बंद ठेवण्यात येणार आहे.

सुसाट चालकांची आता खैर नाही

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कळंबोली ते खालापूर टोलनाक्यादरम्यान दोन्ही मार्गिकांवर सीसीटीव्ही कमान बसवण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर किलोमीटर 54 जवळही उद्या कमान बसवण्यात येणार आहे. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून वेगमर्यादेचे उल्लंघन, लेन कटिंग, अवैध वाहतूक यावर पोलिसांना नजर ठेवता येणार आहे. सीसीटीव्हीमुळे घाटात सुसाट धावणाऱयांवरही आता दंडात्मक कारवाई होणार आहे.

अशी होणार वाहतूक बदल

या ब्लॉकच्या कालावधीत कार आणि इतर लहान वाहने अमृतांजन उड्डाणपूल, वाघजई मंदिर, खंडाळा चेकिंग पॉईंट, खंडाळा गाव या मार्गे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळवण्यात येणार आहे. काम सुरू आहे तोपर्यंत जड आणि अवजड वाहनांना बोरघाटात पुण्याच्या दिशेने जाणाऱया मार्गिकेवर आणि पर्यायी मार्गावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या ब्लॉकच्या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन बोरघाट पोलीस पेंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश भोसले, उपनिरीक्षक अनिल शिंदे आणि खंडाळा महामार्ग पेंद्राचे उपनिरीक्षक सुनील महाजन यांनी केले आहे.