जिवाची मुंबई करण्यासाठी जुळ्य़ा भावांची हातसफाई; मोबाईल आणि आईस्क्रिमच्या दुकानात मारला डल्ला

मुंबईचा झगमगाट बघून त्यांना मौजमजा करायची हाव सुटली. मजुरीच्या कामातून मिळणारा पैसा तुटपुंजा असल्याने त्यांनी शॉर्टकट मार्ग स्वीकारला. रात्रीच्या वेळेस दारू ढोसून जुळय़ा भावांनी एक मोबाईलचे दुकान पह्डले. 33 मोबाईल, 15 स्मार्टपह्न चोरून दोघे चुटकीसरशी पसार झाले. चोरलेला मुद्देमाल व्यवस्थित लपूनही ठेवला. पण ते सर्व विकण्याआधीच भांडुप पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या.

सज्जाद मस्लिम खान आणि आजान मस्लिम खान असे अटक झालेल्या दोघा जुळय़ा भावांची नावे आहेत. मूळ बिहारचे असलेले हे दोघे तीन आठवडय़ांपूर्वीच कामासाठी मुंबईत आले होते. कांजूर मार्ग परिसरातील इमारतीत ते मजुरीचे काम करीत होते. 31 जानेवारीच्या रात्री दारू ढोसल्यानंतर ते भांडुप पश्चिमेकडील स्टेशन रोडवर असलेल्या रामदेव मोबाईल शॉप या दुकानासमोर आले. त्यांनी बंद दुकानाचे शटर उचकटले आणि दुकानातील मोबाईल चोरून पोबारा केला. याप्रकरणी दुकान मालकाने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दिली. एसीपी आगरकर, वरिष्ठ निरीक्षक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक टेकवडे तसेच दरेकर, कासार, कोळी, कचरे, आटपाडकर या पथकाने तपास सुरू केला. आरोपींनी दुकानातला सीसीटीव्ही दुसऱया दिशेने फिरवून ठेवल्याने त्यात ते सापडले नाही. पण मानवी कौशल्य व खबऱयांच्या जोरावर पथकाने अचूक शोध घेतला.

मोबाईलच्या दुकानात चोरी केल्यानंतर या भावांनी भांडुप परिसरातील एका आईस्क्रिमच्या दुकानातील पैसे चोरले होते. जिवाची मुंबई करण्यासाठी मजुरीतून मिळणारा पैसा कमी पडतो म्हणून हे गुन्हे आरोपींनी केले. या दोन्ही गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.