जपानच्या हानेडा विमानतळावर दोन विमानांची धडक; 367 प्रवासी घेऊन जाणारे विमान जळून खाक, पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू

जपानची राजधानी टोकियोमधील हानेडा विमानतळावर प्रवासी आणि तटरक्षक दलाच्या विमानाची धडक होऊन मोठी दुर्घटना घडली. प्रवासी विमानात 367 प्रवासी आणि 12 कर्मचारी होते. धडक झाल्यानंतर प्रवासी विमानाने पेट घेतला आणि जळून खाक झाले.  विमानात लहान मुलेही होती. दुर्घटना घडताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. किंकाळय़ांनी विमान हादरून गेले. मात्र घटना घडल्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाच्या तब्बल 70 गाडय़ा धावपट्टीवर दाखल झाल्या आणि संपूर्ण विमान पेट घेण्याच्या आत विमानातील प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले. या दुर्घटनेत तटरक्षक दलाच्या विमानातील  पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या वैमानिकाने सुटका करून घेतली.  दरम्यान, दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असे जपानच्या परिवहन आणि पर्यटन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी जात होते तटरक्षक दलाचे विमान

भूकंपग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदत घेऊन तटरक्षक दलाचे विमान निघाले होते. दुर्घटना घडल्यानंतर हानेडा विमानतळ पूर्णपणे बंद करण्यातआल्याची माहिती हानेडा विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जपानी एअरलाईन्सचे एअरबस ए-350 हे विमान सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास शिन चितोसे विमानतळावरून रवाना झाले होते. सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी ते विमान हानेडा विमानतळावर उतरले. याचवेळी या विमानाची आणि एमए-722 या तटरक्षक दलाच्या विमानाची धडक झाली.

ज्युनियर एनटीआर थोडक्यात बचावला 

जपानमध्ये आलेल्या भूपंपातून आरआरआर फेम अभिनेता ज्युनियर एनटीआर थोडक्यात बचावला. ज्युनियर एनटीआर गेल्या आठवडय़ापासून जपानमध्ये सुट्टी घालवत होता. त्याने ‘एक्स’वरून आपला अनुभव शेअर केला. घरी सुखरूप परतल्याचे त्याने सांगितले. गेला संपूर्ण आठवडा तिथे घालवला. जपानचे नागरिक ज्याप्रकारे बहादुरीने या संकटाचा सामना करत आहेत त्याबद्दल अप्रूप वाटते. सर्वकाही लवकर ठीक होईल, स्ट्राँग राहा, अशा भावना ज्युनियर एनटीआरने व्यक्त केल्या आहेत.

पश्चिम जपानमध्ये भूपंपात 48 जणांचा मृत्यू

वाजिमा ः नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पश्चिम जपानला हादरवणाऱ्या शक्तिशाली भूपंप धक्क्यांनी 48 बळी घेतले असून अनेक भागांत हजारो इमारती, वाहने, बोटी यांचे नुकसान झाले आहे. काही भागांत आणखी मोठे धक्के बसण्याची शक्यता असल्यामुळे अधिकाऱ्यांनी नागरिकांना घराबाहेरच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.  सोमवारी दुपारी चारच्या सुमारास 7.6 रिश्टर क्षमतेच्या भूपंपाने इशिकावाच्या किनाऱ्याजवळ आणि लगतच्या परिसरात केलेल्या वाताहातीनंतर मंगळवारीही भूपंपाचे उपधक्के सुरू होते. इशिकावा येथे 48 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण गंभीर जखमी झाले आहेत.