भाजप सरकार चालवू शकत नाही, हे मणिपूर, हरियाणातील घटनांवरून दिसून येते; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. भाजप राज्यकारभार करू शकत नाही, हे मणिपूर आणि हरियाणाच्या घटनांवरून दिसून आले आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर घणाघात केला. तसेच महिलांचा अशाप्रकारे अपमान आणि बदनामी होत असेल तर हेच रामराज्य आहे काय, असा सवालही त्यांनी केला.

प्रत्येक अधिवेशनावेळी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होते. याआधीच्या अधिवेशनावेळीही झाली होती. काही वेळा विषय ठरवलेले असतात तर काहीवेळा अचानक काही विषय पुढे येतात. मांडले जातात. त्या विषयांवर आम्ही चर्चा करतो आणि एकत्रितपणे रणनिती ठरवत वाटचाल करतो, असे ते म्हणाले. पुण्यातील कालच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या भाषणात अनेक बारकावे आहेत. ते लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी पहिल्या सर्जिकल स्ट्राईकबाबत केलेले वक्तव्य आणि इतर मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्याकडे लक्ष दिल्यास शरद पवार यांची भूमिका स्पष्ट होत आहे. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. इंडियाची बैठक मुंबईत होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातील ही बैठक होईल, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात अनेक जण मृत्यूमुखी पडले. तसेच कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या या घटना धक्कादायक आहे. याचा खेद आहे. नीतीन देसाई हा सर्वांसोबत मिळून मिसळून वागणारा माणूस होता. त्यांच्यासाठी काहीही अशक्य नव्हते. एखादी गोष्ट करायची ठरवल्यावर ते ती गोष्ट करायचेच. असा उमदा कलाकार आपल्यातून अशा प्रकारे जावा, हे दुःखदायक आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली अर्पण केली. समृद्धी महामार्गावरचे अपघात आणि काल झालेली दुर्घटना यांची माहिती घेतल्यास त्यामागील कारणे आणि  त्यात  अशा प्राणघातक त्रुटी राहू शकतात, हे धक्कादायक आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

संभाजी भिडे यांना ते गुरुजी मानत असतील, तर ते काही बोलले आहेत, ते सर्वच बरोबर आहे का असे त्यांचे मत आहे का? … भविष्यातील गोष्टींकडे न पाहता विनाकारण ते इतिहास उगाळत आहोत. इतिहासाच्या उत्खननातून काहीही मिळणार नाही. भविष्याकडे दुर्लक्ष करून जनतेला इतिहासात गुंतवून ठेवायचे ही पद्धत राज्याला आणि देशाला घातक आहे. त्यांच्या वक्तव्यांबाबत सरकारने ठाम भूमिका घेण्याची गरज आहे. भिडे यांच्याबाबत आदर ठेवत गुरुजींनी चांगले धडे आपल्या विद्यार्थ्यांना द्यावे, हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेने महिलांचा नेहमीच सन्मान केला आहे. राज्यात शक्ती विधेयक आणण्यासाठी आपण पुढाकार घेतला. विधानपरिषदेत उपसभापतीपदी आपण महिलेला बसवले. त्या दुसऱ्या महिला उपसभापती आहेत. असे असूनही त्यांच्याकडून अशा प्रकारच्या वागणुकीची अपेक्षा नव्हती, असेही ते म्हणाले. कर्नाटकमध्ये निवडणुका होऊन त्यांचे अधिवेशनही झाले. मात्र, अजूनही तिथे विरोधीपक्षनेता निवडण्यात आलेला नाही. तिथे विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेता आहे का, अशी परिस्थिती आहे. असे असताना राज्यातील विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आता राज्यात विरोधी पक्षेनेतेपदाबाबत निर्णय झाला आहे. आता रीतसर त्यांची नेमणूक करण्यात येईल, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मणिपूर आणि हरियाणात जे होत आहे, त्यावरून तिथे सरकार आहे का,, असा प्रश्न निर्माण होता. हेच त्यांचे रामराज्य आहे काय, असा सवालही त्यांनी केला. मणिपूरमध्ये महिला राज्यपाल आहे. देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत. असे असताना मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत, हे दुर्दैवी आहे. अशा बदनामीकारक घटना घडत असतील तर डबल इंजिन सरकार काय करत आहे, असा सवालही त्यांनी केला. भाजप सरकार चालवू शकत नाही, हे मणिपूर आणि हरियाणातील घटनांवरून दिसून येते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातही त्यांचे सरकार आले नव्हते. फोडफोडी करत त्यांनी सरकार स्थापन केले. कर्नाटकातील जनतेने संयम ठेवत त्यांनी निवडणुकीत भाजपला हद्दपार केले. महाराष्ट्रातही जनता त्यांना जागा दाखवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजप राज्यकारभार करू शकत नाही, हे मणिपूर आणि हरियाणातील घटनांवरून सिद्ध झाले आहे, असेही ते म्हणाले.

सीताहरण झाल्यानंतर रामायण घडले. द्रौपदीचे वस्त्रहरण झाल्यानंतर महाभारत घडले. महिलांचा सन्मान करणे, ही आमची संसकृती आहे. जर महिलांचा अशा प्रकारे अपमान होत असेल तर हे रामराज्य किंवा हिंदू राष्ट्र नाही, असेही ते म्हणाले. सत्यपाल मलिक यांनी पुलवामाबाबत केलेल्या धक्कादायक माहितीबाबत कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सत्यपाल मलिक हे त्या काळात जम्मू कश्मीरचे राज्यपाल होते. ते भाजप परिवाराच्या जवळचे आहेत. त्यामुळे त्यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे. तरीही त्याबाबत भाजपने प्रतिक्रिया दिलेली नाही, हे धक्कादायक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.